तुमच्या वर्षभराच्या वास्तव्यात भारत-अमेरिका संबंध कसे राहिले आहेत?
भारत व अमेरिका यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने हा काळ ऐतिहासिक होता आणि भारताने माझे हृदय जिंकलेय. त्यामुळे इथल्या वास्तव्याचा हा कालखंड आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी ही आजपर्यंत कधीही नव्हती एवढी अधिक सखोल आणि व्यापक झाली आहे. जग बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या काही उपक्रमांमध्ये आपण आता एकत्रपणे कार्यरत झालो आहोत आणि ही क्षेत्रे समुद्राच्या तळापासून ते ताऱ्यांच्या अंतापर्यंत इतकी सर्वव्यापी आहेत.
भारताच्या पंतप्रधानांचा व्हाइट हाऊसचा अधिकृत दौरा असो, त्यानंतर आमच्या नेत्यांनी नवी दिल्लीत जी२० शिखर परिषदेत घेतलेला सहभाग असो; जेट इंजिनांच्या संयुक्त निर्मितीसाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल असो, १९० अब्ज डॉलरहून अधिक मूल्याची व्यापारी भागीदारी असो, की अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांची आजवरची सर्वाधिक संख्या असो… सर्वच बाबतीत उभयतांमधील वाढते सौहार्द दिसून येत आहे. या गोष्टी म्हणजे यापुढच्या काळात आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी रचलेला नवा सुदृढ पायाच आहे. अमेरिकेचा राजदूत म्हणून आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल मी आनंदी आहेच, पण त्याचबरोबर यापुढील काळात आपण अधिक काही भरीव करू शकू, याविषयीची खात्री आणि ते काय असेल याबाबतची उत्कंठाही मला आहे.
भारतीयांचे व्हिसा अर्ज बराच काळ प्रलंबित आहेत. त्याबद्दल काय प्रगती आहे आणि विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, ती कशी?
गेल्या दोन वर्षांत व्हिसाच्या बाबतीतील परिस्थिती लक्षणीय बदलली आहे. भारतातील अमेरिकेच्या दूतावास-वकिलातींमधील व्हिसाची प्रतीक्षा यादी जवळपास शून्यावर आली आहे. त्यास अपवाद आहे, तो केवळ बी१, बी२ बिझनेस आणि पर्यटन श्रेणीचा. तिथेही आम्ही प्रतीक्षायादीचा कालावधी ७५ टक्क्यांहून खाली आणला आहे. अंग झोकून काम करणाऱ्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आठवडी सुट्टीतही काम केले आणि त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले.
भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पोहोचून वेळेत त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू करता यावे, नोकरदार मंडळींना एकमेकांच्या व्यवसायसमृद्धीत सहभागी होता यावे आणि व्यापारवृद्धीसाठी आवश्यक त्या बाबी त्वरेने हाताळल्या जाव्यात, या विचाराने सर्वांनी झटून काम केले. अर्थात, भारतात अमेरिकन व्हिसाला मोठी मागणी आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यासाठी प्रतीक्षाकाळ कमीतकमी करण्याकरिता आम्ही जोमाने प्रयत्न करत आहोत. कधीकधी अर्जदारांना वैद्यकीय कारणास्तव, अनपेक्षित मृत्यू किंवा व्यावसायिक कारणामुळे तातडीची प्रवासाची गरज भासते. अशा वेळी जलद गतीने व्हिसा मुलाखत मिळविण्यासाठी तुम्ही पुढील वेबसाइटवर माहिती मिळवू शकता… https://www.ustraveldocs.com/in/en/expedited-appointment
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये किंवा शहरांमध्ये कित्येक भारतीय विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. त्यामुळे भारतीय पालकांमध्ये चिंता आहे. त्याविषयी त्यांना कसे आश्वस्त कराल?
अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या खुशालीविषयी आम्हालाही चिंता असते. हा आमच्या दृष्टीने विशेष अग्रक्रमाचा विषय आहे आणि भारतीय पालकांना आम्ही सांगू इच्छितो की जेव्हा त्यांची मुले अमेरिकेत शिकायला येतात, तेव्हा त्यांची मुले ही आमची मुले असतात. अमेरिकेतील त्यांचे वास्तव्य सुखद व्हावे यासाठी या विद्यार्थ्यांसाठी अनेक साधने आणि स्रोत आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. कुटुंबापासून कोसो दूर असलेल्या या विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य लाभावे. सार्वजनिक जागी सुरक्षित कसे राहावे याची माहिती मिळावी किंवा सभोवतीचे वातावरण समजून घेता यावे. यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करून दिले आहे.
आमच्या विद्यापीठ संकुलांमध्ये सुरक्षा यंत्रणा असते, स्थानिक कायदे अंमलबजावणी यंत्रणाही सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतात. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात १.६५ लाख भारतीय विद्यार्थी पदवीशिक्षण घेत आहेत. ही संख्या इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. इतकी मोठी संख्या पाहता, कधीतरी काही प्रसंग उद्भवू शकतात. परंतु अशा प्रसंगांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य माहिती पुरवणे, मदत उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
काळजी वाटावी असे जे काही प्रसंग घडल्याचे सांगितले जाते, त्यामागे काही विशिष्ट कारण असल्याचे किंवा केवळ ते विद्यार्थी भारतीय होते म्हणून त्यांना लक्ष्य केल्याचेही समोर आलेले नाही. असे निरीक्षण खुद्द भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही नोंदवले आहे. आता प्रत्येकाला स्वतःची काळजी घेण्यासाठी काहीएक सावधपणा कुठेही बाळगावाच लागतो, तरच तुमचे वास्तव्य चांगले होऊ शकते.
न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्याप्रकरणानंतर वाद झाला. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांना तडा गेला आहे का? तुमच्या उद्गारांवरूनही अमेरिका दुटप्पी वागत असल्याची टीका झाली. उभय राष्ट्रांमधील संबंधांना बाधा येऊ नये, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात?
भारत-अमेरिका यांच्यात आजवर कधी नव्हते एवढे दृढ आणि सखोल नातेबंध सध्या निर्माण झाले आहेत, हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. हे प्रकरण दोन्ही देशांनी ज्या कुशलतेने हाताळले आहे, तो या सुदृढ नात्याचा ढळढळीत पुरावा आहे. दोन्ही देशांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि भारताकडून त्याचा सखोल तपास केला जात आहे. या तपासातून जे निष्कर्ष समोर येतील, त्याविषयी आम्हाला वेळोवेळी अवगत करण्यात येईल असेही भारत सरकारने आम्हाला स्पष्ट केले आहे. भारत सरकार आपला शब्द पाळेल अशी अपेक्षा आहे. याबाबतीत सुरू असलेल्या फौजदारी तपासाच्या तपशीलाबाबत मी काही भाष्य करू शकणार नाही, कारण ते अमेरिकेच्या न्याय व्यवहार खात्याच्या अखत्यारीत येते.
रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण क्षेत्रात आगामी काळात कसे संबंध असतील?
हा जागतिक स्थित्यंतराचा काळ आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणापासून ते मध्य पूर्वेतील संघर्षापर्यंत सर्व घडामोडींमधून हे दिसून आले आहे की जगाच्या एखाद्या भागात घडणाऱ्या घटनेचे जगभरात पडसाद उमटत असतात. शाश्वत शांततेची पायाभरणी करण्यासाठी एकत्र काम करण्याकरिता आजच्याइतका महत्त्वपूर्ण काळ यापेक्षा कधीही आला नसेल. या प्रयत्नांमध्ये भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे आणि हिंद-प्रशांत क्षेत्र खुले आणि मुक्त रहावे, याचा प्रसार करण्यात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र खुले राहावे, त्याद्वारे आपली राष्ट्रे एकमेकांशी जोडली जावीत, एकमेकांची समृद्धी व्हावी, सुरक्षित वातावरण तयार व्हावे, असे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.
भारत आणि अमेरिका या दोघांनाही दहशतवादाची झळ पोहोचलेली आहे आणि जगभरात दहशतवादाला आळा घालणे हे सामाईक उद्दिष्ट आपल्या उभयतांचे आहे. नागरी कायद्यांची अंमलबजावणी, दहशतवादाचा बीमोड, सागरी सीमा आणि भूसीमांचा आदर, कायद्याचे अधिष्ठान जपणे आणि अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालणे, याबाबतीत अमेरिकेने भारताला सहकार्य केले आहे.
सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, अंतराळ संशोधन यांसह अनेक बाबतीत आम्ही २+२ स्तरावरची मंत्रिपातळीवरील चर्चा नियमितपणे करत असतो. इंडक्स एक्स ही संरक्षण सहकार्यासाठी झालेली शिखर परिषद, सामरिक व्यापार चर्चा तसेच आयसीईटी ही अद्ययावत तंत्रज्ञान आदानप्रदानाविषयीची शिखर परिषद या प्रकारच्या उपक्रमांद्वारे भारताच्या संरक्षण उद्योगांबरोबर अमेरिकेचे सहकार्य अधिक वृद्धिंगत झाले आहे.