मागील काही काळापासून कांदा, टोमॅटो या दररोजच्या जेवणातील प्रमुख भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक हॉटेल मालकांना अशी भीती आहे, की त्यांना इच्छा नसतानाही किमती वाढवायला भाग पाडलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडून कोणत्याही सवलतीची अपेक्षा नाही, सर्व ऑफर्स आणि सवलती निश्चितपणे बंद होणार असल्याचं चित्र असून त्यामुळे आता तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील.
रेस्टॉरेंट चालकही त्रस्त
स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे संस्थापक आणि ओह कलकत्ता आणि मेनलँड चायना सारख्या ब्रँडचे मालक अंजन चॅटर्जी यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की भाज्यांचे इतकं वाढलेले दर जरी हंगामी असले, काही काळापुरतं असले, तरी यावेळी ते इतके वाढले आहेत की ते पचणंच कठीण झालं आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतीचा आम्हालाही त्रास होत असून आमचं उत्पन्नही कमी होत आहे.
लहान खाण्याची दुकानंही चिंतेत
खाद्यपदार्थांची छोटी दुकानं, स्टॉल चालवणाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील बर्गर आणि पिझ्झा जॉइंट बाइट्स एन ग्रिलचे संस्थापक जॉर्ज कुरियाकोस यांनी सांगितलं, की आम्ही वाढत्या महागाईमुळे बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या स्लाइसची संख्या कमी केली आहे. तसंच भाज्यांच्या किंमती वाढल्याने आम्ही आमच्या मेन्यूमधून सीजर आणि ग्रीक सलाड काढून टाकले आहेत.
भाज्यांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, तर…
त्याशिवाय क्विक सर्विस रस्टॉरेंट चेन वॉव मोमोजचे सह-संस्थापक आणि सीईओ सागर दरयानी यांनी म्हटलं, की जर पुढील १५ ते २० दिवसांत भाज्यांच्या किंमती झाल्या नाहीत, तर ते ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आपल्या मेन्यूच्या दरांमध्ये वाढ करू शकतात. मोमोज सॉस बनवण्यासाठी टोमॅटो आणि मिरची लागते. मात्र भाज्यांच्या किंमती वाढल्याने केवळ सॉससाठी आम्ही ग्राहकांकडून अधिक पैसे घेऊ शकत नाही. त्यामुळे मेन्यूमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नाही.