गुरुवारी सकाळची ताजी आकडेवारी पाहता, घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १६ वर पोहोचला आहे. महाकाय होर्डिंगखाली आणखी काही जण दबलेल्या अवस्थेत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईत धुळीच्या वादळासह पावसावेळी हे होर्डिंग पडले होते. संबंधित कंपनीचा मालक भावेश भिंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केले. ‘मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात त्यांची २४ वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही. याचा अर्थ राहुल गांधी यांची मोदींना भीती वाटत आहे. महाविकास आघाडी राज्यात ३५ जाग जिंकणार आहे. त्यामुळे भाजप घाबरला आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतली परंतु कांदाप्रश्नावर अवाक्षरही काढले नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे,’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
चौकशीची केली मागणी
‘होर्डिंग दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि सरकार जबाबदार आहे. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती काल गेली. आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिंडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचे फोटो कोणासोबत असू शकतात त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव जुना आहे; परंतु नागरिक आता भाजपला ओळखून आहेत. या सगळ्या घटनेची उचस्तरीय चौकशी करावी,’ अशी मागणी या वेळी वडेट्टीवार यांनी केली.