लोकसभा निवडणुकीला उमेदवारी मिळत नाही म्हणून नाराज झालेले आबा बागुल यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून पर्वती विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. परंतु पर्वती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी कदम यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान आबा बागुल यांनी त्या जागेसाठी बराच प्रयत्न केला होता. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोध भाजप अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांचा २०१९ ला पराभव झाला. भाजपच्या माधुरी मिसाळ त्यावेळी निवडून आल्या.
आबा बागुल पुण्यात गेले ३० वर्ष नगरसेवक राहिले आहेत. महापौर पद सोडलं तर सर्व पदे आबा बागुल यांनी भूषवली आहेत. महापालिकेत असलेल्या तगड्या अनुभवाच्या जोरावर आबा बागुल पुढील मोठ्या पदाच्या प्रतीक्षेत आहेत.
पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली होती. यामध्ये आबा बागुल यांचं नाव होतं. आबा बागुल यांच्यासोबत २० उमेदवार इच्छुक होते. रवींद्र धंगेकर यांचंही यात नाव होतं. अनेक बैठकांनंतर आणि चर्चेनंतर अंतिमत: धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आबा बागुल नाराज झाले. आबा बागुल यांनी काँग्रेस भवनात आंदोलनही केलं. दरम्यान या प्रसंगात त्यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का होता. परंतु नाना पटोले यांनी केलेल्या मनधरणीमुळे आबा बागुल पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा शब्द घेतला.
‘मटा’सोबत बोलताना आबा बागुल म्हणले, “गेली वीस ते तीस वर्षे मी काँग्रेसचा नगरसेवक आहे. पण मला विधानसभेची संधी मिळत नाही. २०१९ च्या निवडणुकीत पर्वती विधानसभेची मी मागणी केली होती. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येऊ शकतो पण याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढे सांगितल्या. सध्या वरिष्ठांनी मला काम करण्याचे आदेश दिले”
दरम्यान, पर्वती विधानसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे मात्र आता आबा बागुल यांच्या तिकीटाच्या मागणीनंतर आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी होईल का? हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल.