१९ मे रोजी पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या या अपघातात दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी, त्याचे आई-वडील आणि आजोबांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सुनील तांबे यांनी अल्पवयनी मुलाच्या पालकांना विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्यासमोर हजर केले आणि त्यांच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. रक्ताचा नमुना बदलेपर्यंत संपूर्ण व्यवहाराचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यासमोर बसवून या दोघांची चौकशी करायची आहे, असं फिर्यादी पक्षाने न्यायाधीशांना सांगितलं.
ससूनच्या सीसीटीव्हीत दोघं संशयित
पोलीस त्या दोन व्यक्तींनाही अटक करणार आहेत ज्यांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि डॉ. अजय तवले यांच्यात संपर्क करुन दिला, दुसरा ज्याने विशाल अगरवालच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोरला ३ लाख रुपये दिले. हे दोघे ससून रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही दिसून येत आहेत. हे या तपासातील महत्त्वाचे धागेदोरे उलगडू शकतात असं पोलिसांनी सांगितलं कोर्टात सांगितलं.
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने पालकांनाच दिल्याची शक्यता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. हळनोरने अल्पवयीन मुलाचे रक्त गोळा केले परंतु ते कंटेनरमध्ये ठेवले नाही. त्यानंतर त्याने अल्पवयीनच्या आईच्या रक्ताचा नमुना घेतला. त्यावर अल्पवयीन मुलाचे नाव लिहिले आणि रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण तपासण्यासाठी ते फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवले, अशी माहिती तांबे यांनी कोर्टात दिली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना त्या अल्पवयीन मुलाचे रक्त असलेली सिरिंज शोधायची आहे जी डॉक्टर हळनोर यांनी अल्पवयीन मुलाच्या पालकांना विल्हेवाट लावण्यासाठी दिली असल्याचा संशय आहे. त्यानंतर विशेष न्यायालयाने विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवालला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.