मतदारांनी केलेलं मतदान लोकशाहीच्या पवित्र उत्सवाला आणखी ठसठशीतपणे कुंदन देणारा ठरलं. कारण या ठिकाणी अजित पवारांसारख्या अजस्त्र प्रचार यंत्रणा असलेल्या नेत्याला लोकांनी नमवलं. ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामान्य जनतेने हातात घेतली होती. त्याचे प्रतिबिंब म्हणजे आज बारामतीच्या भिगवन रस्त्यावर नाचणारे कार्यकर्ते हे अल्पभूधारक भूमिहीन ज्यांना राहायला नीट घरे नाही. अशाच स्तरातील जास्त होते. सामान्यातल्या सामान्य लोकांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा.
ही निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी सुप्रिया सुळेंबरोबर बारामतीत फिरणार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. पण हळूहळू कार्यकर्ते येत गेले. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुप्रिया सुळेंबरोबरच रोहित पवारांनी केले संपूर्ण पवार कुटुंब या प्रचार यंत्रणेत एकत्र आलं. राजेंद्र पवार असतील सुनंदा पवार असतील. आमदार रोहित पवार असतील शर्मिला पवार असतील… श्रीनिवास पवार असतील.. युगेंद्र पवार असतील..या सर्वांनी ही प्रचार यंत्रणा पेरण्याचे काम केले. त्यातही रोहित पवारांचा आक्रमक प्रचार मतदारांना भावला.
निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक घटना घडल्या. ज्यामध्ये शरद पवार हे तुम्हाला भावनिक करतील असं सांगणारे अजित पवारच खऱ्या अर्थाने लोकांना भावनिक करत होते. निवडणूक विकासाच्या दिशेने नेता नेता भावनिक तिकडे भरकटली आणि लोक एवढे भावनिक झाले.. की, त्यांनी कोणतीच यंत्रणा हातात नसलेल्या सुप्रिया सुळेंना मोठ्या ताकदीने निवडून दिले. आज या निवडणुकीचा निकाल जसा जसा समोर येत होता. प्रत्येक फेरी गणित बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयासमोर गर्दी वाढत होती. कार्यकर्ते उल्हासित होत होते. कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत होता कार्यकर्त्याचा उत्साह वाढत होता. थोड्यावेळाने रस्त्यावर गुलाल आणि भंडाऱ्याचा खच पडला. गुलाल आणि भंडाऱ्याने नाव निघालेल्या बारामतीच्या भिगवन रस्त्यावर थोड्याच वेळात ढोल ताशा आणि तुतारीने आसमंत दणाणून टाकला.