महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मनसेनेही विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. याबाबत आज अमित ठाकरेंनी माध्यमांजवळ संवाद साधला आहे. विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, ही शाब्दिक कोटी समजायलाच माझी १० मिनिटं गेली. पाच वर्षांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या मुलाला आमदार बनवताना राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा घेताना काही वाटलं नाही का? वरळीच्या वेळेस राज ठाकरेंनी दिलेला पाठिंबा ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती. तसेच निवडून आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी काम केल्याचे सांगत अमित ठाकरे म्हणाले, आता शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करुन काही होणार नाही. एका आमदाराला पाच वर्ष मिळतात. वरळी कोळीवाड्यात ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते, तसे ते फिरताना दिसले नाही. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. आता अमित ठाकरेंच्या या प्रत्युत्तराला मातोश्रीवरुन कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.