बारामतीची लेक राज्यात पहिली, पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी; खाकी वर्दीतलं स्वप्न पूर्ण

दीपक पडकर, बारामती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा २०२१ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील मयुरी महादेव सावंतने राज्यात महिला वर्गातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

एमपीएससीतर्फे ६ जुलै आणि १७ जुलै २०२२ रोजी ही परीक्षा घेतली होती. निकालासह प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुणही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मयुरी सावंतची दुसऱ्यांदा पीएसआय म्हणून निवड झाली आहे. सध्या मयुरी शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत.

एमपीएससी तर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अजरापत्रित गट – ब मुख्य परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्यातील अजय कळसकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्ह्यातीलच मयुरी सावंतने महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे. वाघळवाडी येथील मयुरी सावंतने आपलं खाकी वर्दीचं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं.
चिपळूणच्या लेकाचं घवघवीत यश, पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास; राष्ट्रीय पातळीवर फडकवला कोकणचा झेंडा
सोमेश्वरनगर येथील विवेकानंद अभ्यासिका या ठिकाणी मयुरी सावंतने चार वर्षे अभ्यास केला. अभ्यासिकेचे प्रमुख गणेश सावंत यांनी मयुरीला मार्गदर्शन केलं. आपली मुलगी अभ्यासाच्या जोरावर ‘खाकी वर्दीत’ दिसावी अशी आई-वडिलांची इच्छा होती. यासाठी मयुरीने बारा – बारा तास सातत्याने अभ्यास केला. सण, समारंभ काही काळ दूर ठेवले. मोबाईलचा आवश्यकतेसाठीच वापर केला आणि यशाला गवसणी घातली.
शेतीत भागत नसल्याने वडिलांनी मजुरी केली, आईने दागिने मोडले; फौजदार बनून लेकाने पांग फेडले

मयुरी पहिलीपासून बारावीपर्यंत वाघळवाडीतील उत्कर्ष आश्रम शाळेतच शिकली. बारावीनंतर माळेगावच्या शिव विद्या प्रसारक मंडळ कॉलेजमध्ये बी. ई. मेकॅनिकलची पदवी मिळवली. शाळेत शिकत असतानाच मयुरीला पोलीस वर्दीचं आकर्षण वाटत होतं. वडील महादेव सावंत हे क्रीडाशिक्षक होते. स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत जाण्याचा त्यांनीही प्रयत्न केला होता. त्यामुळे मुलीने पोलीस अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आई-वडिलांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मयुरीने सहा वर्षे अखंडपणे परिश्रम घेतले आणि उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.