बजरंग बाप्पांचा अजितदादांना फोन, अमोल मिटकरी म्हणाले- ‘हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी!’

मुंबई : लोकसभा निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे काही खासदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चा झडत असतानाच बीडचे नवनिर्वाचित जाएंट किलर खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी तुम्हाला काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील, असे सांगत त्यांनी सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. दुसरीकडे अमोल मिटकरी यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

लोकसभा निवडणूक निकालात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविताना प्रतिस्पर्धी महायुतीला जोरदार दणका दिला. या निकालाने अनेक नेत्यांची चलबिचल वाढलेली असून आपल्या राजकीय भविष्यासाठी काहीजण वेगळ्या विचाराच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. तसे दावे प्रतिदावेही अनेक पक्षाच्या नेत्यांकडून केले जात आहेत. महाविकास आघाडीची झालेली सरशी त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेवर होईल, अशी चर्चा होत असताना महायुतीमधील काही जण मविआच्या साथीला येतील, अशी भाकिते जाणकार व्यक्त करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, असा दावा ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला. तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
पंकजांना पाडून जाएंट किलर ठरलेल्या बजरंग बाप्पांचं प्रमोशन? थेट पवारांशेजारची खुर्ची मिळाली!

अमोल मिटकरी काय म्हणाले?

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी मंगळवारी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. साखर कारखान्याच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी अजित पवार यांना फोन करून त्यांचे गाऱ्हाणे दादांकडे मांडल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. हा तर फक्त ट्रेलर आहे, विधानसभा निवडणुकीच्या आधी तुम्हाला पिक्चर पाहायला मिळेल, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

दुसऱ्या गटाचा खासदार अजित पवार यांना फोन करून आपल्या गाऱ्हाणे मांडत असेल तर ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठी भूषणावह बाब असल्याचे सांगत मी बाप्पांबद्दल केलेला दावा जर खोटा असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, असे आव्हानही मिटकरी यांनी दिले.