फ्लेक्सवर फ्लेक्स! भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर; पोलिसांची तारांबळ उडवणारा तो कोण?

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले. पण याच बॅनरवर एका तरुणानं थेट त्याचे बॅनर लावले. त्यातून त्यानं रोजगार, नोकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार समजताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे या तरुणानं बॅनरवर त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही छापला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात घेऊन गेले. इथल्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराचा आक्रोश येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा बॅनरवरुन देण्यात आला होता. भाजपनं मोदींच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर बरोजगारीचा प्रश्न विचारणारे बॅनर लावल्याचा प्रकार समोर येताच पोलिसांची धावपळ झाली. आयुष कांबळे नावाच्या तरुणानं हे बॅनर लावले होते. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते. पोलिसांनी हे बॅनर खाली उतरवले.
बालेकिल्ला राखण्यात अखेर शिंदेंना यश, जागा मिळाली, पण उमेदवार ठरेना; तीन नावं चर्चेत
आयुष कांबळे टेम्पो चालवून गुजरात करतो. तो सध्या पदवीचं शिक्षण घेत आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. सुशिक्षित तरुणांचा नोकऱ्या नाहीत. त्यामुळे कोणी तरी या प्रश्नांना वाचा फोडण्याची गरज होती. विरोधात बोलल्यावर कारवाई होणार याची कल्पना होती. आपणच का बोलू नये असा प्रश्न पडला. त्यामुळे तरुणांचा प्रश्न उपस्थित केला, असं आयुषनं सांगितलं.

लग्नातलं उदाहरण देत पंतप्रधान मोदींच्या मंगळसूत्रावरील विधानाचा प्रियंका गांधींकडून समाचार

आमच्या हक्काचे रोजगार राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मनात असलेले विचार मी बॅनरच्या माध्यमातून मांडले. मी हे कोणाच्याही सांगण्यावरुन केलेलं नाही. मी स्वत: ते फ्लेक्स बांधले आहेत. फ्लेक्स लावल्यावर दडपशाही होणार याची कल्पना होती. पण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्या फ्लेक्सवर शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे फोटो आहेत. ही माझी दैवतं आहेत. ती माझ्याशी पाठिशी आहेत. मी कोणताही गु्न्हा केलेला नाही. पोलिसांकडून अद्याप तरी फोन आलेला नाही. काही कारवाई केल्यास कायदेशीर उत्तर देऊ, अशा शब्दांत आयुषनं बॅनर लावण्यामागील त्याचा हेतू सांगितला.