पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी बाणेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये फडणवीस यांनी पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘चारशे पार होणारच आहे, मग मतदानाला का जायचे, असे अजिबात समजू नका. काहीही झाले तरी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा,’ अशी विनंतीवजा सूचनाच त्यांनी केली.
फडणवीस यांनी केंद्र सरकारची विकासकामे गिरवताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. ‘विरोधकांना ही निवडणूक ग्रामपंचायत, महापालिकेसारखी वाटत आहे. एकीकडे विकासपुरुष नरेंद्र मोदी यांचे विकासाचे इंजिन आहे. त्याला महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या रूपाने एकनाथ शिंदे व अजित पवारांचे डबे जोडलेले आहेत; पण दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांची खिचडी असलेल्या सर्वच प्रमुख नेते स्वत:ला इंजिनच समजतात. त्यांच्या इंजिनामध्ये केवळ त्यांच्या परिवाराला जागा आहे, असंही ते म्हणाले.
विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, हे अजून कोणाला माहिती नाही. प्रत्येकाला तिथे पंतप्रधान व्हायचे आहे. जर ते निवडून आले, तर प्रत्येक वर्षी संगीत खुर्चीचा खेळ खेळतील आणि जो खेळ जिंकेल तो पंतप्रधान होईल. असे सरकार निवडायचे, की ठाम भूमिका घेणारे देशाला विकास पथावर निवडून जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थिर सरकार निवडायचे, याचा विचार पुणेकरांनी करावा,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
उमेदवाराशिवाय झाली सभा
पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मुरलीधर मोहोळ ‘ट्रॅफिक’मध्ये अडकल्याने पोहोचू शकले नाहीत. यामुळे बाणेरची सभा मुरलीधर मोहोळ यांच्या अनुपस्थितीतच पार पडली. मोहोळ सभेला वेळेत पोहोचू न शकल्याने त्यांनी नागरिकांसाठी संदेश पाठवला खरा; पण ते खासदार झालेच तर पहिले काम पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे करायला हवे, याचीही प्रचिती त्यांना आली असावी.