“उद्धव ठाकरे तेव्हाच म्हणाले होते की ते भाजपसोबत जाणार नाहीत. ते म्हणाले त्यांनी अडीच वर्षांचं वचन दिलं होतं. मी म्हटलं बोलून बघा. पण, ते म्हणाले की त्यांना आता भाजपवर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे ते भाजपशी चर्चा करणार नाही. जर, अडीच वर्ष द्यायची असेल तर त्यांना पहिली अडीच वर्षांची टर्म हवी होती. पण, माझा त्यांच्यावर विश्वासच नाही असं ते म्हणाले. देवेंद्रजींनी त्यांना ५० वेळा फोन केले. जर तुम्हाला अडीच वर्ष हवी होती, तर तुम्ही ते बोलायला हवे होते. अडीच वर्ष काय हवेतून देणार होते का? मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते ऐकले नाहीत” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सेनेचे आमदार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याबद्दल आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, असंही शिंदेंनी सांगितलं. “आम्ही समोरासमोर बोललो. आपल्या आमदारांना हे (काँग्रेससोबतची युती) नको आहे, ही आमची विचारधारा नाही, असं मी म्हणालो होतो. आमची (काँग्रेस आणि शिवसेना) विचारसरणी वेगळी आहे. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी एकच आहे. ही एक नैसर्गिक युती आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी आणि प्रमोद महाजनजी यांनी ज्या पद्धतीने युती केली, त्याप्रमाणेच सरकार स्थापन व्हायला हवे होते”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करत ‘माझे वडील गद्दार आहेत’ असं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे, असं म्हटलं होतं. यावर बोताना शिंदे म्हणाले की, “मी अशा चर्चेत गुंतत नाही. मी वैयक्तिक हल्ले करत नाही.”
ते माझ्यावर आणि पंतप्रधान मोदींवर रात्रंदिवस आरोप करतात आणि यावरूनच त्यांचा तोल सुटला आहे, हे दिसून येते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याची गोष्ट त्यांना पचनी पडलेली नाही. २०१९ मध्ये त्यांनी जनतेचा, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांचा विश्वासघात केला. मग त्यांच्या कपाळावर ‘महागद्दार’ लिहावे असे मी म्हणू का?, असंही शिंदे म्हणाले.