मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, २६-११ दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यांमध्ये ‘जनतेचे वकील’ असे नाव कमावलेले निकम यांना भाजपने मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मटा कट्टा’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी वकील म्हणून आलेले अनुभव आणि राजकारणातील पदार्पणाबाबत भाष्य केले.
‘२६-११ दहशतवादी हल्ल्यात १० अतिरेक्यांपैकी ९ मारले गेले आणि कसाब जिवंत होता. त्यावेळी कसाबसाठी तीन स्वतंत्र खटले चालवण्याचे मला सांगण्यात आले. मी ठामपणे नकार दिला. ‘केवळ कसाबला फाशी देणे हे महत्त्वाचे नसून हा कट भारतातील नव्हे तर पाकिस्तानातील आहे’, हे सिद्ध करण्यासाठी एकत्र आरोपपत्र दाखल झाले. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डेव्हिड हेडलीकडून पुरावे मिळवण्यास अनेकांनी विरोध केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांना सांगितले की, डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार करणार आहे. तेव्हा फडणवीस यांनी अजित डोवाल यांची भेट घडवून आणली. त्यानंतर अमेरिकेत गेलो आणि डेव्हिड हेडलीने शिकागो न्यायालयात कबुलीजबाब दिला. हा पुरावा पाकिस्तानने मान्य केला आणि निकाल तुमच्यासमोर आहे. मुळात राष्ट्रहितासाठी राजकीय इच्छाशक्ती दांडगी असायला हवी. ही इच्छाशक्ती मला देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसली. राष्ट्रहिताचा निर्णय घेण्याची ताकद मोदी सरकारमध्ये दिसली’, असे निकम यांनी सांगितले.
‘न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचे सांगत पत्र लिहिणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव असल्यास राज्यपालपद का स्वीकारतात, राज्यसभा सदस्य का होतात? सरकारकडून नेमणूक होते, पण तुम्ही नाकारू शकता. निकाल विरोधात गेला की, न्यायमूर्तींवर दबाव, निकाल बाजूने लागला की मोकळपणाने निकाल लागला, अशा म्हणण्याला काही अर्थ नाही. आरोप करण्यापेक्षा पुरावा द्यावा. केवळ सरकारला झोडणे हे योग्य नाही’, या शब्दांत निकम यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
‘सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राजकारणात यायची गळ घातली नव्हती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी थेट तिकीटच दिले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक लढायची असेल तर आमच्या पक्षातून लढा, असे सांगितले. त्यावेळी दोन्ही नेत्यांना मी नकार दिला. त्यानंतर राजकारणात येण्याचा विचारही नव्हता. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. वकिली व्यवसाय केल्यानंतर अचानक राजकारणात येणे, हे माझ्या आयुष्यातील स्थित्यंतर आहे. मुंबईतील उमेदवारीची घोषणा अनपेक्षितपणे झाली. राजकारणातील जन्म हा गेल्या आठ ते दहा दिवसांचा आहे’, असे स्पष्ट मत निकम यांनी मांडले.
‘उज्ज्वल निकल यांना उमेदवारी जाहीर झाल्यावरच हेमंत करकरे यांच्या संबंधित आरोप का झाले? केवळ आरोपींशी सहानुभूती बाळगून आरोप होत आहेत. आव्हानांना सामोरे जाऊन पारदर्शकता ठेवण्याकडे माझा कल आहे. तो वकिली करतानाही होता आणि आता राजकारणातही असणार आहे’, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘…तर पाकिस्तानच्या हाती आयते कोलीत’
‘विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केला की, मी देशद्रोही आहे. करकरेंचा मृत्यू आरएसएसच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या गोळीबारात झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या अशा म्हणण्याने देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होण्याची शक्यता आहे. उद्या जर पाकिस्तानने म्हटले, आरएसएसने मुंबईत दहशतवादी हल्ला केला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार’, असा प्रश्न उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला. आरोप करणाऱ्यांची विचारशक्ती परिपक्व नाही. देशात राहणारे विरोधी पक्ष नेते कोणाचा अजेंडा राबवत आहेत, याचे उत्तर २० मे रोजी जनता मतदानातून त्यांना देणार आहे, असे निकम म्हणाले.