बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत पवार काका पुतण्यांनी आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सांगता सभा घेतली. मतदानाच्या निर्णायक टप्प्यात सभेच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी मतदारांना साद घातली. यावेळेस बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लक्ष्य केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आताची लढत वैचारिक आहे. घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात लढाई आहे. पवार घराण्यातील उणीदुणी काढल्याशिवाय देशात क्रांतीच घडणार नाही अशी परिस्थिती आहे. पण आरे बोलल्यावर कारे बोलायला ताकद लागत नाही. आरे बोलल्यावर माहित असून ना गप्प बसायला जास्त ताकद लागते, ती माझ्यामध्ये आहे. याआधी शांत नव्हते, इतकं रडून झालंय की, अश्रूही येत नाही डोळ्यात. रडायचं तरी कोणासाठी, तु्म्हाला महाराष्ट्राची फिकर नसेल तर कशासाठी अश्रू वाया घालू. इथे प्रत्येकाच्या अश्रूंना किंमत आहे.
अजितदादा म्हणतात की मोदी आणि शाहांशी माझे चांगले संबंध आहेत. तर एकदा तरी शेतकरी आणि सामान्यांसाठी मोदींना आणि शाहांना फोन फिरवा आणि प्रश्न मार्गी लावा. मला विचारता ना मी १० वर्षांत काय केलं? माझं मराठीतील पुस्तक काढून वाचलं असतं तर तुमचं मत तुम्ही तुतारीलाच दिलं असतं. कारण सोलापूर आणि सांगली या मतदारसंघांपेक्षा बारामतीला केंद्राचा जास्त निधी मिळाला आहे, असं आव्हान सुळेंनी अजितदादांना केलं आहे.
एका विचाराची सरकार असल्यावर विकासकामं होतात असं म्हणता, तर मग केंद्रात काँग्रेस आणि आघाडीचं सरकार असताना गुजरातमध्ये भाजपाचं सरकार होतं, तेव्हा वायब्रंट गुजरात झालं का नाही झालं? कुठलंही काम अडलं नाही. तर मग भाजपा सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत? असा परखड सवाल सुळेंनी व्यासपीठावरुन उपस्थित केला आहे.
केंद्रात आता इंडिया आघाडीचंच सरकार येणार असून सुनील केदारांनी विदर्भात तुतारी वाजवून त्याची सुरुवात केलीच आहे. त्यांना महाराष्ट्रातील ३० ते ३५ जागा निवडून आणून आम्ही देखील साथ देणारच आहेच, असे आश्वासन देत आम्ही वाघिणीसारख्या लढत राहू, आमचं कुटुंब ही राज्याची जनता आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ माझ्याशी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.