प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पाच एक्स्प्रेसना अतिरिक्त थांबे, पुणे स्थानकावरील ताण होणार कमी

प्रतिनिधी, पुणे : पुणे स्टेशनवर दररोज सुमारे सव्वा लाख प्रवाशांचा राबता असून, येथील गर्दी कमी करण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ गाड्यांना इतर स्थानकांवर थांबे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पाच ‘एक्स्प्रेस’ना पुणे परिसरातील चार स्थानकांवर थांबे दिल्याने पुणे स्टेशनवरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. याविषयी पुणे रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. यामुळे उपनगरांतील प्रवाशांची सोय होणार आहे.पुणे रेल्वे स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सुटतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांना फक्त पुणे स्टेशन येथेच थांबा असल्यामुळे शहराच्या विविध भागांतून प्रवाशांना येथेच यावे लागते. अनेक भागात सकाळी व सायंकाळी होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांची धावपळ उडते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गाड्यांना वेगवेगळ्या स्टेशनवर थांबे देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयाला मान्यता आल्यास त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे.

अग्निरोधक यंत्रणा अहवाल ऑनलाइन दाखल करता येणार, राज्यभरात गृहनिर्माण सोसायट्यांसाठी नवा उपक्रम
पुण्याहून सुटणाऱ्या आझाद हिंद एक्स्प्रेस, जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस अशा गाड्यांना सध्या फक्त पुणे स्टेशन येथेच थांबा आहे. या गाड्यांना आता पुणे स्टेशनबरोबरच अन्य एखाद्या स्टेशनवर थांबा दिला जाणार आहे. दौंडच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांसाठी हडपसर टर्मिनल येथे थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे पूर्व पुण्यातील प्रवाशांना स्टेशनपर्यंत यावे लागणार नाही. तर, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांसाठी शिवाजीनगर, चिंचवड, तळेगाव अशा काही स्थानकांवर थांबे देण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.

पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी बाजूच्या काही रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

– इंदू दुबे

डीआरएम, पुणे

अतिरिक्त थांबा देण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस

– आझाद हिंद एक्स्प्रेस

– जम्मू तावी

– झेलम एक्स्प्रेस

– सिंहगड

– प्रगती एक्स्प्रेस

प्रस्तावित थांबे

– हडपसर टर्मिनल

– शिवाजीनगर स्टेशन

– चिंचवड स्टेशन

– तळेगाव स्टेशन