रोहित पवार म्हणाले की, “मलिदा गॅंगमधील कार्यकर्ते असे म्हणतात की काटेवाडी गावातील बूथचे अधिकचे मतदान सुप्रिया ताईंना झाले तर आम्ही तुमच्याकडे बघतोच. परंतु मी तुम्हाला सांगतो हे काहीही करू शकणार नाहीत. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर पुढील सहा महिन्यातच यांना विधानसभेसाठी पुन्हा तुमच्याकडे यायचे आहे. त्यामुळे वीज बंद करीन, पाणी बंद करील अशा धमक्या देत आहेत, यापैकी ते काहीही करणार नाहीत”.
कुटुंब कुणी फोडत असेल तर त्याचा बदला घ्यायचा
मागील साठ वर्ष ज्या विचाराच्या पाठीमागे आपण आहोत त्याच विचाराच्या मागे उभे राहायचे आहे. आपले कुटुंब कुणी फोडत असेल तर त्याचा बदला घ्यायचा. तुम्हाला पदे साहेबांमुळे मिळाली. त्याच पदांच्या जोरावरच तुम्ही विकास निधी मतदारसंघामध्ये आणला. आता तेच नेते सांगतात की विकास निधी मी आणला. मात्र साहेबांमुळे पदे मिळाली म्हणून तुम्ही विकास निधी आणला हे ते सोयीस्करपणे कसे विसरतात?
पूर्वीचे ओरिजनल अजितदादा असते तर त्याला तिथेच ठोकला असता
कन्हेरीच्या प्रचार सभेमध्ये मंगलदास बादल नावाचा माणूस आला होता. त्याच्या भाषणाची कॉलिटी बघा. मी जर तिथे असतो तर त्याच्या कानाखाली लावली असती, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला. यावर उपस्थितांनी देखील रोहित पवारांच्या सुरात सूर मिसळला.
“आपल्या गावातील बरीच माणसे तिथे होती. राजकारणाबद्दल काही बोल पण साहेबांबद्दल बोलायचं नाही असे त्याला ‘संबंधितांनी’ सांगायला हवे होते. मी ज्या अजितदादांचा फॅन होतो ते पूर्वीचे ओरिजनल अजितदादा असते तर दादांनी त्याला तिथेच ठोकला असता. मात्र अजितदादांनी काय केले तर डोके खाली घातले. हे योग्य आहे का? ज्या गोष्टी तुम्हाला बोलता येत नाहीत त्या अशा भाडेकरूंच्या माध्यमातून तुम्ही बोलता आणि ते आम्हाला कळणार नाही का?” असाही सवाल यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.