प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे एकाहून एक कारनामे समोर येत असून खासगी गाडीवर लाल दिवा लावल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे कोषागार कार्यालयातही स्वतंत्र दालन आणि वाहनाची मागणी त्यांनी केली होती तसेच मुळशी तालुक्यातील जमिनीसाठी पोलिस अधीक्षकांवर दबावही आणल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पूजा खेडकर संबंधित या गोष्टींची चर्चा संपूर्ण देशभरात होत असल्याने काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही आक्रमक पवित्रा घेऊन पूजा आणि त्यांच्या कुटुंबावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
बनावट कागदपत्रे सादर करून पूजाने आयएएस पोस्ट मिळवली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी होत आहे. ज्याप्रमाणे राजकारण्यांची ईडी चौकशी होते, त्याप्रमाणे अनधिकृत मार्गाने भरमसाठ संपत्ती गोळा करणाऱ्या पूजाच्या वडिलांची आणि कुटुंबाची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याचवेळी पूजाला बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या संबंधित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक व्हायला हवी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.
पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा दावा करणारी ध्वनिचित्रफीत समाज माध्यमांत ‘व्हायरल’ झाली आहे. हातात छोटी बंदूक घेऊन बाउन्सरच्या मदतीने त्या शेतकऱ्यांना धमकावताना असल्याचा दावा करण्यात येतोय.
याप्रकरणी पौड पोलिसांनी शुक्रवारी (१२ जुलै) रात्री खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. खेडकर यांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगली असून, त्याबाबतचा कायदेशीर परवाना त्यांच्याकडे आहे, असे खेडकर यांचे वकील अॅड. रवींद्र सुतार यांनी व्हायरल व्हिडीओनंतर माध्यमांना सांगितले.