काय प्रकरण?
वनरक्षक सारिका दराडे यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर यशवंत डांगे (वय ४५) व संदीप शिवराम कासार (वय ६२, दोघे रा. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर चालक असून, संदीप याची शेती; तसेच हॉटेल व्यवसाय आहे. आरोपी व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा कोणत्याही परवानगीशिवाय विक्रीकरिता घेऊन आले होते. याची माहिती मिळताच वनरक्षक विभाग आणि हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी; तसेच इतर साहित्य असा एकूण तीन कोटी २७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधी रुपयांची किंमत
अत्यंत दुर्मीळ गोष्ट व्हेल माशाची उलटी अत्यंत दुर्मीळ असून, ती अत्तर किंवा सुगंधी उत्पादनासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधी रुपयांची किंमत आहे. ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. कोलकाता किंवा नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणी हिंजवडी पोलिसांनी हस्तगत केलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तपासणी होणार आहे. कोलकाता किंवा नागपूर येथे असणाऱ्या प्रयोगशाळेत ही उलटी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
तस्करीचे रॅकेट?
एका नागरिकाने दोन्ही आरोपींना व्हेल माशाची उलटी घेऊन पुण्यात बोलाविले होते. पुण्यात आले, की संपर्क करतो, त्यानंतर पुढील व्यवहार करू, असे यांना सांगण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे रॅकेट शहरात सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
देवमाशाची उलटी म्हणजे नक्की काय?
अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, देवमासा (व्हेल) पित्ताशयातून एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. हा स्राव म्हणजेच माशाची उलटी. ती समुद्राच्या पाण्यात तरंगत राहते. सूर्यप्रकाश आणि खाऱ्या पाण्यामुळे त्यातून ‘अंबरग्रीस’ची निर्मिती होते. हा स्राव काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगाचा तेलकट पदार्थ असतो. समुद्रात तरंगताना त्याला आकार येतो आणि तो कडक होत जातो. माशाच्या शरीरातून बाहेर पडल्यावर ‘अंबरग्रीस’ला वास नसतो. मात्र, हवेच्या संपर्कात आल्यावर त्याला सुगंध प्राप्त होतो. ‘अंबरग्रीस’ सहजासहजी समुद्रात आढळत नाही. दुर्मीळ असल्याने त्याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे. प्रामुख्याने अरब देशांत ‘अंबरग्रीस’ला अधिक मागणी आहे.
व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली आहे. या उलटीचा नमुना तपासणीसाठी कोलकाता किंवा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. त्यानंतर ही उलटी वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. – कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक