पुण्यात मुली किती सुरक्षित? हॉस्टेलमधील रुममेटचे व्हिडिओ बॉयफ्रेंडला पाठवले, दोघांवर गुन्हा

पुणे: पुण्यात तुमची मुलं मुली जर शिक्षणासाठी पाठवत असाल तर ही बातमी नक्की वाचा. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. म्हणून पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात पाठवतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुलींसोबत असे भयानक कृत्य घडत आहेत, जे वाचून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यानींचे चोरून व्हिडिओ काढल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने विद्यार्थिनीने हॉस्टेलमधील रुममेटचे चोरून व्हिडिओ काढून आपल्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचा आरोप आहे. या दोघांनी मिळून अनेक विद्यार्थीनींचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याचीही प्राथमिक माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्टेल प्रशासनाकडून आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की, हॉस्टेममधील विद्यार्थिनीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते. त्यामुळे त्यांचं एकमेकांसोबत खूप बोलणं व्हायचं. तसेच, ते स्नॅपचॅट या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करत होते.

चॅट न करता ते एकमेकांना थेट आपण सध्या काय करत आहोत याचे व्हिडिओच काढून पाठवायचे. यादरम्यान, रूममध्ये इतरही मुली राहत असल्याने त्यांचेही फोटो व्हिडिओ चित्रित होत होते. ही गोष्ट रूममध्ये राहणाऱ्या इतर मुलींना समजली आणि त्यांनी थेट हॉस्टेल प्रशासनाला तक्रार दिली. हॉस्टेल प्रशासने याबाबत पोलिसात तक्रार नोंद केली. या सगळ्याचा पूर्ण तपास अजून सुरू आहे.

मोबाईलमध्ये आणखी काय डेटा सापडतो का, याचा शोध सुरू आहे, असं शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितलं आहे.