गजबजलेल्या मार्गावर गॅस गळती
पुण्यातील जंगली महाराज रोड हा दिवसाच्या कुठल्याही वेळी गजबजलेलाच असल्याचं पाहायला मिळतं. फक्त पादचाऱ्यांचीच नाही, तर वाहनांचीही वर्दळ दिवस-रात्रीच्या कुठल्याही प्रहरी सुरु असते. महाविद्यालयीन विद्यार्थी असोत, किंवा पर्यटक असोत किंवा परिसरातील रहिवासी असोत, गर्दीने जेएम रोड कायमच फुललेला असतो. अशातच इथे गॅस गळती झाल्याची बातमी समोर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
शिवम हॉटेलच्या समोर गॅस गळती
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील शिवम हॉटेलच्या समोर गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. जेएम रोडवरील या भागातील रस्त्याचं काम सुरु होतं. हे काम चालू असतानाच अचानक खोदकामाच्या दरम्यान गॅस लीकेज सुरु झाल्याची माहिती आहे. सुदैवात यात कुठलीही हानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही.
परिसरात भीतीचं वातावरण
वायू गळती सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने आसपासच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही काळ नेमकं काय सुरु आहे, हे समजण्यात नागरिकांना वेळ गेला, मात्र वायू गळती झाल्याची बातमीही वाऱ्यासारखी पसरली आणि एकच गोंधळ उडाला. या बातमीसरशी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
खबरदारीचा उपाय
प्रशासनाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून थोड्याच वेळात गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र तूर्तास परिसरातील नागरिकांना घरात बसण्यास सांगण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून हानी टाळण्यासाठी दुकानंही बंद करण्यात आली आहेत.