फडणवीस म्हणाले, ‘निर्भया प्रकरणानंतर, गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन आरोपींना तो सज्ञान असल्यासारखे गृहीत धरून त्या नियमावलीप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी बाल न्याय मंडळासमोर पोलिसांनी या अपघात प्रकरणात केली होती. मात्र, बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांना टिकेचे धनी व्हावे लागले.’
‘एसीपी’ करणार ‘त्या’ प्रकरणाची चौकशी
‘गुन्हा दाखल झाल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात विधीसंघर्षित मुलासह त्याच्या कुटुंबीयांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या. त्याची दखल घेऊन सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यातील संपूर्ण दिवसाचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले जाणार आहे,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
पोलिसांच्या अर्जावर फेरविचार होणार
अल्पवयीन मुलाला सज्ञान ग्राह्य धरून त्यावर कारवाई करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. मात्र, त्या विषयी फेरविचार करण्याचा अधिकार बाल न्याय मंडळास आहे. त्यामुळे ‘तुम्ही परत त्यांच्याकडे जावा. त्यांनी निर्णय दिला नाही, तर आमच्याकडे अर्ज दाखल करू शकता,’ असे सत्र न्यायालयाने सांगितले आहे. त्यावर बुधवारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.
पोलिसांनी अपघाताचा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. मृतांना न्याय मिळेपर्यंत न्यायालयात पोलिस दाद मागतील. सुरुवातीपासूनच याबाबत कठोर भूमिका घेतली असून, पोलिस या प्रकरणाचा अखेरपर्यंत पाठपुरावा करतील.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री