पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना मुलाने त्रोटक उत्तरे दिली. अपघात झाला, तेव्हा कारमध्ये आणखी कोण होते? कार कोण चालवित होते? अपघात नेमका कसा झाला? यांसह अनेक प्रश्न पोलिसांनी मुलाला विचारले. तेव्हाचे आता काही आठवत नाही, असे उत्तर मुलाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीदरम्यान, शिवानी अगरवाल यांनाही काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनीही उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जामीन अर्जावर पाच जूनला सुनावणी
कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर शनिवारी (१ जून ) होणारी सुनावणी बुधवारपर्यंत (५ जून) पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, त्यास बचाव पक्षाने विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने पोलिसांना शनिवारी (एक जून) आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली होती. मात्र, पुढील सुनावणी पाच जूनला होणार असल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले आहे.