दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा शोधण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘गुगल’ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाने ‘गुगल’शी करार करण्यासाठी पुणे पोलिसांना नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पुणे पोलिस दलात सुमारे १० हजार मनुष्यबळ आहे. त्यापैकी वाहतूक शाखेत केवळ नऊशे ते साडेनऊशे जण नेमणुकीस आहेत. मुख्य रस्त्यांवर जवळपास अडीचशे सिग्नल आहेत. सिग्नल नसलेल्या चौकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे मनुष्यबळ पुरेसे ठरत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरणार आहे.
शहरात दिवस उजाडल्यापासून संपेपर्यंत वाहतुकीचे वेगवेगळे टप्पे अनुभवायला मिळतात. सकाळी शाळा, कॉलेज, नोकरदार यांची वाहतूक आणि सायंकाळी त्यांचा परतीचा प्रवास या वेळात बरीच वाहतुकीची कोंडी असते. बाजारपेठांमधील वर्दळीची वेळ त्याहून वेगळी असते. या सगळ्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला जाणार आहे.
‘गुगल’ काय करणार?
शहरात कोणत्या वेळेला कोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, याची माहिती ‘गुगल’ देणार आहे. वाहतूक कोंडीचा पॅटर्न काय आहे, हेही सांगणार आहे. उदा. एखाद्या मुख्य रस्त्यावर कोंडी होते, त्या वेळी तेथील जोड रस्त्यांवर काय चित्र असते, याचाही अभ्यास त्यात होणार आहे. त्यात कोंडीच्या वेळेला त्या ठिकाणी असणारी वाहनसंख्याही सांगणार आहे.
सिग्नलच्या वेळा निश्चित करण्यासाठी ‘गुगल’ची मदत
‘गुगल’कडे शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची इत्थंभूत माहिती आहे. वाहतूक कोंडी झाल्यावर वाहतूक पोलिसांना सिग्नल बंद करून नियंत्रण करावे लागते. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यावर मुख्य रस्ता आणि जोड रस्त्यावरील वाहनांची वर्दळ याची माहिती ‘गुगल’कडून मिळाल्यावर वाहतूक पोलिस त्यानुसार सिग्नलच्या वेळेत बदल करणार आहेत.
‘गुगल’ची अशी होणार मदत
– शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग सांगणार.
– कोणत्या रस्त्यावर कोणत्या वेळी कोंडी होते, याची माहिती मिळणार.
– कोंडीच्या वेळेला त्या ठिकाणची वाहन संख्या कळणार.
– विकासकामे सुरू असलेल्या रस्त्यावर वाहनचालकांना पर्यायी रस्ते देणार.
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शास्त्रीय मदत व्हावी, यासाठी ‘गुगल’ची मदत घेणार आहोत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.– अमितेशकुमार, पोलिस आयुक्त