ओळख पटली; पोलिस ठाण्यातही तेच होते?
ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना घेताना तेथे अन्य व्यक्ती उपस्थित असल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसून आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्या दोघांची ओळखही पटली असून, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाही ते दोघे तेथे उपस्थित होते.
पोलिसांच्या उपस्थित घडले सर्व?
येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अल्पवयीन मुलाला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्या वेळी पोलिस कर्मचारीच मुलाला घेऊन गेले होते. ससून रुग्णालयात मुलाची संपूर्ण वैद्यकीय तपसणी होत असताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी सोबत राहणे अपेक्षित होते. मात्र, तेव्हा एका आलिशान कारमधून आलेल्या तीन व्यक्ती तेथे पोहोचल्या. रक्तनमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. पोलिस कर्मचारी असताना बाहेरील व्यक्ती तेथे उपस्थित राहतात, मुलासोबत आणि ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधतात, हे कसे शक्य झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.
न्यायालयातही दिली माहिती
अल्पवयीन मुलगा रक्त देण्यासाठी ससून रुग्णालयात आला, तेव्हा एका आलिशान कारमधून आलेल्या तीन व्यक्ती तेथे पोहोचल्या. रक्तनमुना घेईपर्यंत त्या व्यक्ती तेथे उपस्थित होत्या. त्या व्यक्ती कोण, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्ती कोण होत्या, याबाबत काहीच हालचाल केलेली दिसत नाही.
‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात दिसताहेत संशयित
‘विशाल व शिवानी अगरवाल यांच्या रक्ताचा नमुना घेऊन ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठवायचा आहे; तसेच रक्ताचा नमुना घेतलेल्या दिवशी रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात काही संशयित दिसत असून, आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे,’ असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.