कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगातील एका आलिशान कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कारच्या धडकेमुळे दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी हवेत काही फूट उडून रस्त्यावर आदळली; तर दुचाकीस्वार तरुण दुचाकीसोबत काही अंतर फरफटत गेला. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली.
आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि अल्पवयीन मुलाला दारु देणाऱ्या पब मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटसोबत काम करण्यात येईल. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल. आम्ही कोणालाही वाचविणार नाही, असे अमितेश कुमार म्हणाले.
CCTV तपासणार
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आलाय. या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातून समजेल, असेही त्यांनी सांगितले.
बार मालकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल. हा मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येतोय. आरोपी दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाइकांची पोलिसांकडून अवहेलना
पुणे कल्याणीनगर येथे झालेल्या रस्ते अपघातातील मृतांचे मित्र, नातेवाइक यांची स्थानिक पोलिसांनी अवहेलना केल्याचे रविवारी दिसून आले. कारचालक मुलावर गुन्हा दाखल करून, कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा केला जात असताना येरवडा पोलिसांनी या नातेवाइकांनाच दरडावून तुमच्यावर कारवाई करतो, असा दम भरला.
कोणत्या अटींवर अल्पवयीन आरोपीला जामीन?
या युवकाने येरवडा वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, त्याने अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक जागृती फलक रंगवावेत आणि मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन करावे, अशा अटी-शर्ती न्यायालयाने घातल्या आहेत.