पुणे अपघातावर पालकमंत्री अजित पवार का बोलत नाहीत? शरद पवार म्हणाले…

मुंबई: कल्याणीनगर येथे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कार भरधाव वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारचालक मुलाला १४ दिवस बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या वडिलांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातातील आरोपींवर कडक कारवाई करू, असे सरकारकडून सांगितले जात असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची यासंबंधी कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मौनाचे विविध अर्थ लावले जात आहेत.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेतली. पीक कर्जाचे पुर्नगठन, विमा कंपन्यांची नुकसान भरपाई देण्यासंबंधीची टाळाटाळ, वीज बिलात सूट मिळणे, मनरेगा कामांसंबंधी नियम शिथिल करणे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा छावण्या सुरू करणे आदी विषयांवर त्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. यावेळी पत्रकारांनी राज्यातील चर्चेत असलेल्या पुणे अपघातावर आणि अजित पवार यांच्या मौनावर त्यांना प्रश्न विचारला.
Pune Porsche Accident: दादा पुण्याचे पालकमंत्री की बिल्डरचे, अजित पवार गप्प का? संजय राऊतांनी सुनावलं

अजित पवार बोलत नाही, तुमचेही आरोपीच्या वकिलाशी संबंध असल्याच्या चर्चा, शरद पवार चिडून म्हणाले…

पुणे अपघातातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शांत का आहेत? ते काहीच का बोलत नाहीत? असे प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारले. त्यावर ते का बोलत नाहीत, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत यावर अधिक बोलणे पवार यांनी टाळले. तसेच आरोपींच्या वकिलांशी आपलेही संबंध असल्याच्या चर्चा आहेत, असे पत्रकारांनी विचारल्यावर पवार जरासे चिडून म्हणाले- “एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही… प्रत्येक गोष्टीवर मीच भाष्य करावे, असे गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही”.

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत की बिल्डरांचे? : संजय राऊत

अजित पवार यांच्या मौनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केली. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेऊन स्वत: पुणे जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली आहेत. पुणे शहर चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असताना अजित पवार गप्प का आहेत? ते पुण्याचे पालकमंत्री आहेत की बिल्डरांचे? असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी विचारला.