पुणेकरांनो, आता घरबसल्या करता येणार तुमच्या भागातील खड्ड्यांची तक्रार, जाणून घ्या टोल फ्री नंबर

प्रतिनिधी, पुणे : रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याच्या समपातळीत नसलेली चेंबरची झाकणे, खचलेला रस्ता, पाणी साचणारी ठिकाणे याबाबत नागरिकांना थेट महापालिकेकडे तक्रार करता येणार आहे. यासाठी महापालिकेने हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. यावर आलेल्या तक्रारींवर दोन ते तीन दिवसांत कार्यवाही केली जाईल, असा दावा पालिकेच्या पथ विभागाने केला आहे.

गेल्या काही महिन्यांत शहराच्या विविध भागांत विविध यंत्रणांनी खोदकाम केले होते. याशिवाय पालिकेच्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेसाठी; तसेच सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भातील कामांसाठी विशेष बाब म्हणून पावसाळ्यातही खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे. या खोदकामानंतर या रस्त्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जात असून, त्यांचे पुर्नडांबरीकरण प्रामुख्याने पावसाळ्यानंतरच केले जाणार आहे.

तात्पुरत्या मलमपट्टीमुळे रस्ते समपातळीवर नाहीत; तसेच पावसाने व अन्य कारणांमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खड्डेदुरुस्ती हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चांदणी चौक की चक्रव्यूह? पादचाऱ्यांसाठी पूल उभारणीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
खड्ड्यांच्या तक्रारीसाठी कार्यालयीन वेळेत ०२०-२५५०१०८३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. भरारी पथकाशी (रविवार वगळता) ९०४९२७१००३ या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे फोटो, व्हिडिओद्वारेही माहिती पाठवता येईल. याशिवाय पीएमसी केअर अॅप व ट्विटर हँडलद्वारेही येणाऱ्या खड्ड्यांविषयक तक्रारींवर पथ विभागाकडून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.