मुंबईला ऑरेंज अलर्ट
तसेच, आज देखील मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगराला हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पुढील काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. आज दुपारी १. ५७ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती आहे. यावेळी समुद्रात ४.४० मीटर उंचीच्या लाटा उसळतील. त्यातच जर पाऊस बरसत असेल तर पाण्याचा निचरा होणार नाही.
रस्ते जलमय, रेल्वे रुळ पाण्याखाली
रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईतील विविध भागात रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तर रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी आहे. सकाळपासून एक्स्प्रेस एकाच ठिकाणी उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
मुंबईतील परिस्थिती पाहता मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील स्थिती पाहून दुसऱ्या सत्रातील शाळा सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
तसेच, मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ॲानलाईन केंद्राच्या ८ जुलै रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत होणाऱ्या परीक्षा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलल्या आहेत, आता या परीक्षा १३ जुलै रोजी होतील, परीक्षेची वेळ आणि ठिकाण सारखेच राहील.