१. ठाणे-CSMT लोकल अखेर सुरु
मुंबईत झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल पावसामुळे विस्कळीत झाली. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अखेर साडेसात वाजल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. परंतु सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे.
२. अधिवेशनात घोषणांची खैरात
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील कामकाजास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका लक्षात घेत अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून अखेरच्या आठवड्यातही घोषणांची खैरात होण्याची शक्यता आहे.
३. वरळी हिट अँड रनविषयी शिंदेंची भूमिका
‘वरळी येथे घडलेली घटना दु:खद आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पोलिसांशी चर्चा झाली असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे जे होईल ते कायद्यानुसारच. कुणालाही वेगळा न्याय, वागणूक देणार नाही’ अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
४. शिंदेंचे राईट हँड राजेश शहा नेमके कोण?
वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेना उपनेते राजेश शहा यांना अटक झाली आहे. अॅट्रिया मॉलजवळ काल पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती थोडक्यात बचावले. दुचाकीला धडक देणारी कार शिवसेना उपनेते राजेश शहा यांची आहे. अपघात झाला त्यावेळी त्यांचा मुलगा मिहीर कार चालवत होता, अशी माहिती कावेरी यांच्या पतीने जबाबात दिली.
५. आसाममध्ये महापूर
आसाममधील पूरस्थिती रविवारीही कायम राहिली. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळपास २४ लाख जणांना बसला आहे. ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. पूर, भूस्खलन आणि वादळ या नैसर्गिक आपत्तीतील मृतांची संख्या ७० वर गेली आहे.
६. विषारी पदार्थामुळेच सत्संगात चेंगराचेंगरी
हाथरसमध्ये दोन जुलै रोजीच्या सत्संगावेळी काही जणांनी विषारी पदार्थांचे कॅन उघडल्यानेच चेंगराचेंगरी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचा दावा भोलेबाबाचे वकील ए. पी. सिंह यांनी रविवारी केला. भोलेबाबाच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर चेंगराचेंगरी हे एक षड्यंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
७. कोलकाता पोलीस आयुक्तांवर शिस्तभंग
केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमधील संघर्ष नव्या वळणावर आला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांचे अधिकृत कार्यालय म्हणजे राजभवनाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने कोलकात्याचे पोलिस आयुक्त विनीत गोयल आणि पोलिस उपायुक्त इंदिरा मुखर्जी यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.
८. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात मोठी अपडेट
अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर. हिंडेनबर्गने अदानीविरोधातील अहवाल प्रकाशित होण्याच्या दोन महिने आधीच त्यांच्या ग्राहकांशी शेअर केला होता. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या अहवालाची आगाऊ प्रत न्यूयॉर्क स्थित हेज फंड व्यवस्थापक मार्क किंग्डन यांच्याशी प्रकाशित करण्यापूर्वी सुमारे दोन महिने आधीच शेअर केली होती, त्यामुळे समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढउतारांचा फायदा झाला. सेबीने हिंडेनबर्गला पाठवलेल्या ४६ पानी ‘कारणे दाखवा नोटिशीत याचे तपशील उघड केले आहेत.
९. सायलीला पूर्णा आजीने स्वीकारलं
ठरलं तर मग या मालिकेत ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर उजाडला आहे. कारण वर्षभराहून जास्त काळापासून पूर्णा आजी जिचा रागराग करत होती, त्या सायलीला तिने अखेर सुभेदारांची सून म्हणून स्वीकारलं आहे. घराच्या चाव्या सोपवत पूर्णा आजीने सायलीला नातसून म्हणून मिठी मारली. यामुळे अर्जुन, कल्पना खुश झाले, तर अस्मिताचा तीळपापड झाला.
१०. रणवीरच्या पदरी मोठा सिनेमा
आदित्य धर पुन्हा एकदा बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट बनवण्यासाठी सज्ज आहे. आदित्य आता अभिनेता रणवीर सिंगसोबत धुरंधर हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रणवीरच्या होणाऱ्या बाळाचा पायगुण चांगला असल्याची चर्चा रंगली आहे.