मराठवाडा आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. या द्रोणीय स्थितीची तीव्रता कमी झाली आहे. तसेच विरुद्ध दिशेने वाहणारी वाऱ्यांची प्रणालीही सक्रीय आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यामध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर पावसाची तीव्रता अधिक आहे.
नैऋत्य मौसमी वारे तसेच पश्चिमेकडून येणारे वारे अधिक सक्रिय होत असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार (६४.५ ते ११५.५ मिमी) ते अति मुसळधार (११५.६ ते २०४.६ मिमी) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार, म्हणजे २०४.५ मिमी पावसापेक्षाही अधिक पाऊस पडू शकतो.
रविवारी सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये कुडाळ येथे १९ सेंमी, देवगड येथे १६ सेंटीमीटर, मालवण येथे १५ सेंमी, सावंतवाडी येथे १४ सेंमी, राजापूर येथे १३ तर वेंगुर्ला येथे ११ सेंमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात पुणे शहरात १२ सेंमी, कागल येथे आठ सेंमी तर खंडाळा बावडा येथे सात सेंमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात रेणापूर येथे सात सेंमी पाऊस नोंदला गेला.
आज, सोमवारी ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे, मात्र मुंबईला रविवारच्या पूर्वानुमानानुसार ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलेला नाही. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवशी ऑरेंज अॅलर्ट आहे. सिंधुदुर्गात सोमवारी तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार, तर मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांमध्येही सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा येथे सोमवार आणि मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो. मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी राज्यात सर्वदूर पावसाची उपस्थिती असू शकेल.
मुंबईत पाऱ्याचा दिलासा
मुंबईमध्ये गेले दोन आठवडे सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३५अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात होते. शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांहूनही अधिक होता. रविवारी पावसानंतर कमाल तापमानात घट झाली असून सांताक्रूझ येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथे ३० अंश से. कमाल तापमान होते. दोन्ही केंद्रांवरील सरासरी तापमान हे अनुक्रमे १.२ आणि ३.७ अंशांनी कमी होते. अजूनही वातावरणात पावसाळी गारवा पुरेसा निर्माण झाला नसला, तरी रोजच्या उकाड्यापासून मात्र सुटका झाल्याची जाणीव आहे.