मिरज विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल पाटील बोलत होते. यावेळी निवडणूक काळातील किस्से मोठ्या खुबीने विशाल पाटील यांनी मांडले.
मिरज विधानसभा मतदार संघातून मोठं मताधिक्य मला देण्याते आले. मात्र पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले, दबाव झुगारला आणि जनतेने मलाच मतदान केले, असे विशाल पाटील म्हणाले.
मिरजकर जनतेने विधानसभेला तीन वेळेला बाहेरच्या व्यक्तीला निवडून दिले मात्र हाच बाहेरचा व्यक्ती घरातल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सांगू लागला होता. मात्र त्यांचे जनतेने आजिबात ऐकलेले नाही, असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातून मिरजसहित पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणायचे आहेत. सांगली जिल्ह्यातील वसंतदादांच्या विचाराच्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवायचं आहे, असेही खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले.
विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा
सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. विशाल पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. ते आधी काँग्रेसचे नेते होते. सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ‘सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला असून त्याचे स्वागत’ अशी पोस्ट खर्गे यांनी ‘एक्स’वर केली आहे.