पहिल्याच दिवशी झोपमोड; प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरविण्याच्या निर्णयाला केराची टोपली
हर्ष दुधे, पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सरकारी, अनुदानित शाळा आज, शनिवारी (१५ जून) सुरू होत आहेत. आजच्या पहिल्याच दिवशी अनेक प्राथमिक शाळांनी चिमुकल्यांच्या वयाचा विचार न करता पुन्हा सकाळी सात वाजता शाळा भरवून त्यांची झोपमोड करण्याचे ठरवले आहे. इतर मंडळांच्या खासगी शाळांनीही सात वाजता शाळा भरवण्याचे ठरवले आहे. शालेय शिक्षण विभागाने ज्युनिअर केजी (पूर्व प्राथमिक) ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ शिक्षणसंस्थांच्या आणि शाळांच्या फायद्यासाठी शाळा सकाळी सात ते आठ वाजतांच्या दरम्यान सुरू करण्याचा अट्टाहास धरण्यात येत आहे.

विदर्भ वगळता राज्यातील शाळा आज, शनिवारपासून सुरू होत आहेत. पुणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी सातच्या सुमारास भरतात. या शाळांमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी लहान मुलांना सकाळी लवकर उठून, तयारी करून स्कूलबस पकडावी लागते. त्याचप्रमाणे पालकांनाही डबा तयार करणे, मुलांची तयारी करून देणे आदींसाठी सकाळी पाच वाजल्यापासूनच उठावे लागते. यात त्यांची ओढाताण होते. अशा परिस्थितीत लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम त्यांच्या वर्गातील उपस्थितीसोबतच, त्यांच्या अध्यापनावर होतो. झोप पूर्ण न झाल्याने, मुले चिडचिड करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

यावर उपाय म्हणून लहान मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांच्या मेंदूच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने फेब्रुवारीत जाहीर केला. त्यानुसार शाळांना येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबाजावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाकडे शिक्षणसंस्थांनी आणि शाळांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

अनेक शाळांनी पूर्वीप्रमाणेच सकाळी सातच्या सुमारास मुलांना बोलावले आहे. काही पूर्वप्राथमिक शाळांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहण्याचा निरोप दिला आहे. त्यामुळे शाळांना मुलांच्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे. अशा शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेबाबत स्पष्टता येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शशांक अमराळे यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे विचारणा केली होती.
कागदावरील कॉलेजांना दणका, नाशिक जिल्ह्यातील ‘या’ सहा महाविद्यालयांची विद्यापीठ संलग्नता होणार रद्द
निर्णय सर्व शाळांना लागू

शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांसोबतच सर्व व्यवस्थापनाच्या (सीबीएसई, आयबी, केंब्रिज, सीआयएससीई) मंडळाच्या शाळांना लागू आहे. मात्र, या शाळांनी आपल्या कार्यपद्धतीत कोणताही बदल केलेला नाही. या शाळा आपल्या पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासोबतच, वेळाही आपल्या मर्जीनुसार ठरवित आहेत. त्यामुळे या शाळांच्या कारभाराला कोण वेसण घालणार, असाही प्रश्न आहे.

शिक्षण विभागाने निर्णयाद्वारे प्राथमिक शाळांच्या वेळेबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून करणे अपेक्षित आहे. शाळांनी वेळेचे नियोजन करण्याबाबत नियमही नमूद केले आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करायला हवे.- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग