विनोद तावडे यांनी शेअर केला व्हिडिओ
मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, ती आता पूर्ण होणार आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरू होत असून त्यामुळे शहराला नवी उभारी मिळणार आहे, अशा आशयाचे ट्वीट विनोद तावडे यांनी केले आहे.
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या नावे ओळखली जाणारी मेट्रो-३ ही ३३ किलोमीटरची राज्यातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो मार्गिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) उभी होत आहे. मार्गिकेचा २७ पैकी १० स्थानकांचा पहिला टप्पा आता सुरु होणार आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे (सारीपूतनगर) ते बीकेसी (प्राप्तिकर कार्यालय) असा असेल.
कोणकोणती स्थानकं?
१. आरे कॉलनी
२. सीप्झ
३. एमआयडीसी
४. मरोळ नाका
५. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २
६. सहार रोड
७. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल १
८. सांताक्रुझ
९. विद्यानगरी
१०. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)
प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स
या मेट्रो मार्गिकेत सध्या कार्यान्वित असलेल्या गुंदवली ते अंधेरी पश्चिम, या मेट्रो-२अ व मेट्रो-७ मार्गिकेप्रमाणे ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स’ असतील. हे दरवाजे फलाटाला लागून असून, ज्यावेळी गाडी येते केवळ त्याचवेळी ते उघडतील. मात्र मेट्रो-२अ व मेट्रो-७मधील दरवाजे हे गाडीच्या निम्म्या उंचीवर आहेत. मेट्रो-३मध्ये हे दरवाजे पूर्ण असतील. यामुळे गाडी फलाटावर नसताना फलाट व रूळ मार्गिका यांच्यात एकप्रकारे काचेची भिंत असेल.