अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचं पवार म्हणाले. ‘आयोगाच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आम्ही आव्हान दिलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट त्यावर फार बोलणार नाही. पण निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. तथ्यांसोबत छेडछाड करुन हा निर्णय देण्यात आला,’ असं पवार म्हणाले. ‘सीएनएम न्यूज१८’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर सविस्तर भाष्य केलं.
अजित पवार, प्रफुल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपसोबत घरोबा करत सत्तेत प्रवेश केला. त्यावरही पवार अतिशय स्पष्टपणे बोलले. ‘आमच्या काही लोकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातले काही जण मला भेटले. कोणत्या परिस्थितीत त्यांना हा निर्णय घ्यावा लागला हे त्यांनी मला सांगितलं. सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर त्यांच्या विरोधात केला जात आहे. त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, अशी अडचण अनेक वरिष्ठ नेत्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली,’ असं पवारांनी सांगितलं.
भाजपसोबत जाण्याचा माझा विचार नव्हता, आजही नाही. त्यामुळे त्यांना मला सोडून जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझा पुतण्या किंवा माझ्या अतिशय जवळचे असलेले प्रफुल पटेल आणि अन्य नेते मला सोडून गेले. प्रॅक्टिकली बोलायचं झाल्यास त्यांच्या मनात कारवाईची भीती होती, असं पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईच्या दबावाबद्दल पवार सविस्तर बोलले. ‘प्रफुल पटेल यांचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल. ते मुंबईतील वरळी परिसरात राहतात. त्यांचं घर फार छान आहे. ईडीनं त्यांच्या घराच्या बहुतांश भागाचा ताबा घेतलाय आणि तिथे कार्यालय थाटलंय. त्यामुळे काही जण त्या बाजूला गेले. त्यांनी मोदींचं नेतृत्त्व मान्य केलं. यंत्रणांचा वापर झाल्यानंच हे नेते भाजपसोबत गेले,’ असं पवार म्हणाले. आता माझी साथ सोडून गेलेल्यांना निवडणूक संपल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा जाच सहन करावा लागेल. माझ्या कुटुंबातील काही जणांनी घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं मला वाटतं, असं मत पवारांनी व्यक्त केलं.