बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोपाच्या मोठ्या फैरी झडल्या. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर वयावरून अनेकदा टीका केली. परंतु मुरब्बी राजकारणी असलेल्या शरद पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत ही निवडणूक हाताळली. त्याचा परिणाम म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीत शरद पवार गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. अजित पवार गट शहरात नाॅट रिचेबल झाल्याचे दिसून आले. पक्ष फुटीनंतर अजित पवार यांची ताकद वाढली होती. त्यांच्यासोबत भाजप, शिंदेसेना, मनसे, रिपाई व अन्य मित्र पक्ष होते. सुळेंसोबत उदधव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेसची ताकद होती. ही ताकद लावत विजय खेचून आणला. इंदापूर, दोंडचे आजी-माजी आमदार, खडकवासल्याचे विद्यमान आमदार अजित पवार यांच्या सोबत असतानाही त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही.
बारामतीच्या राजकारणावर मोठा परिणाम…
सुप्रिया सुळे यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्क्याने झालेला विजय ही निवडणूक एकतर्फी झाल्याचेच दर्शवतो. खडकवासल्याने सुनेत्रा पवार यांना लीड दिले. परंतु इतर पाचही विधानसभा क्षेत्रात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. यानिमित्ताने आता बारामतीच्या राजकारणावर मोठा परिणाम घडून आला आहे.
अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा धुळीला…
अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीत त्यांना इथे मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट..
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अंग झटकून सुनेत्रा पवार यांचे काम केले नाही, हे निकालातून स्पष्ट होते. हे पदाधिकारी फक्त अजितदादा आले की पुढे पुढे करण्यात धन्यता माणणारे आहेत. शिवाय ठेकेदारांची लाॅबी अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरली. मलिदा गॅंग असा उल्लेख आमदार रोहित पवार यांनी केला. त्याला योग्य ते प्रत्युत्तर अजित पवार गटाला देता आले नाही. त्यामुळे या गटाकडे सगळे लाभार्थी असल्याचे जनतेचेही मत झाले. त्यातून सुनेत्रा पवार यांचा पराभव तर सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट पसरला. तर सुप्रिया सुळे यांच्या छोट्याशा कार्यालयाबाहेर विजयी जल्लोष पाहायला मिळाला.