विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर नेमके काय घडले?
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध पक्षांचे आमदार एकमेकांना भेटल्यावर हितगूज करत होते. साहजिक लोकसभा निवडणुकांच्या निकालांवरून कधी टोमणे तर कधी वास्तववादी गप्पा आमदारांमध्ये सुरु होत्या. दुसरीकडे सकाळी साडे अकराच्या दरम्यान विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर, पर्वती विधानसभेच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांची भेट झाली.
या भेटीत अनेकानेक मुद्द्यांवर चर्चा सुरु असताना एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या भूमिकांवरून नाराजी व्यक्त केली. नव्यांना पक्षात संधी मिळते मात्र आपल्याला थांबा थांबा सांगतात हे अतिशय वाईट आहे, असे म्हणत आपल्या मनातील खदखद नाथाभाऊंनी बोलून दाखवली.
पोटातल्या गोष्टी ओठांवर!
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीशी असलेला घरोबा मोडून पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करून न घेता निवडणूक निकालानंतर प्रवेश होईल, असे दिल्लीतील पक्षनेतृत्वाने त्यांना सांगितले. निकाल लागून जवळपास महिना उलटला तरी त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही.
किंबहुना त्यांच्या प्रवेशावर त्यांचे पक्षांतर्गत विरोधक तितकेसे खूश नाहीयेत. उत्तर महाराष्ट्रातील नाथाभांऊचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी तर संभाव्य पक्षप्रवेशावरून जाहीर नाराजी बोलून दाखवली. यावरून दोघांमध्ये सुंदोपसुंदीही सुरु होती. जुन्या काळचा भाजप आणि मोदी-शाह-नड्डांचा भाजप अशी जाणुनबुजून उदाहरणे देऊन बदललेला भाजप नाथाभाऊ अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहरून आलेल्यांना पायघड्या टाकण्याच्या भाजपच्या धोरणांवर नाथाभाऊंनी याआधीही आसूड ओढलेले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी पुन्हा नाथाभाऊ त्याच विषयांवरून पक्षनेतृत्वाला सुनावत आहेत. त्यामुळे नाथाभाऊ विरुद्ध त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असा संघर्ष पाहायला मिळेल हे नक्की…!