निम्म्या पुण्यात आज बत्ती गुल; देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा ८ तास बंद, कोणत्या भागांना फटका?

प्रतिनिधी, पुणे : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यातील बहुतांश भागांचा वीजपुरवठा आज, गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे. त्यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार, नारायण व रास्ता पेठेसह सिंहगड रस्ता, एरंडवणा, शिवाजीनगर आणि औंध गावातील बत्ती दिवसभर गुल राहणार आहे. बहुतांश शहरात एकाचवेळी ‘महावितरण’ची कोणती देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.ऐन पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ‘महावितरण’ने देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी महावितरणच्या शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड विभागांतर्गत विविध परिसरातील वीजवाहिन्यांचा पुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

प्रामुख्याने शिवाजीनगर विभागीय कार्यालयांतर्गत चिंचवड आणि गणेशखिंड उपकेंद्राच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून परिसराचा वीजपुरवठा आठ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामध्ये लक्ष्मी रस्त्याचा काही भागासह शनिवार व नारायण पेठेचा काही परिसर, घोरपुरे कॉलनी, ठुबे पार्क, संचेती रुग्णालय, हर्डीकर रुग्णालय, मॉडेल कॉलनी, दीप बंगला चौक, मोदी बाग, वडारवाडी, गोखलेनगर, जनवाडी, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), जिल्हा व कौटुंबिक न्यायालय, औंध गाव आदी परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

पर्वती विभागांतर्गत सिंहगड रस्त्यावर हिंगणे खुर्द, माणिकबाग, आनंद नगर, विठ्ठलवाडी, जयदेव नगर, जकात नाका, दत्तवाडी, गणेशमळा, पानमळा, जनता वसाहत परिसर, पर्वती गाव व पर्वती पायथा, लक्ष्मीनगर चाळ, दांडेकर पूल, विजयनगर कॉलनी, लक्ष्मी पार्क, आंबिल ओडा, पर्वती दर्शन, अरणेश्वर, सहकार नगर भाग दोन, टिळक रस्ता आदी परिसरात बत्ती गुल राहणार आहे. कोथरूडमध्ये एसएनडीटी उपकेंद्रातून अलंकार वाहिनीवर अवलंबून एरंडवणा परिसरात पांडुरंग कॉलनी, अभिनव शाळेजवळचा परिसर, प्रेरणा अपार्टमेंट, डेक्कन पाटबंधारे परिसर, श्वेता अपार्टमेंट आदी भागात वीज पुरवठा बंद असणार आहे. त्याबाबत वीजग्राहकांच्या मोबाइलवर संदेश पाठविण्यात येणार असल्याचे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्येही काही भागांत टप्प्याटप्प्यांत बत्ती गुल

पिंपरी-चिंचवड विभागांतर्गत टेल्को उपकेंद्रातून होणाऱ्या वीजपुरवठ्यावर अवलंबून काही परिसरात टप्प्याटप्प्याने वीज बंद ठेवली जाणार आहे. त्यामध्ये रिव्हर रेसिडेन्सी परिसरात सकाळी दहा ते दोन, कुदळवाडी परिसरात दुपारी दोन ते पाच, तर भोसरी उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी दहा ते पाच या वेळेत बंद राहणार आहे, असे ‘महावितरण’तर्फे सांगण्यात आले.