लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि कल्याणसह १३ मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पूण होऊन जेमतेम २४ तासही उलटत नाहीत, तोच उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला जात आहे. कारण चार जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाला जवळपास १५ दिवस बाकी असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तिघा उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष केला जात आहे.
पुणे – मुंबई महामार्गवरील उर्से टोल नाका येथे श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि श्रीरंग बारणे यांचे पोस्टर लागले आहेत. आमचे बंधू राहुल शेवाळे आणि आमचे बंधू मित्र श्रीकांत शिंदे यांची प्रचंड बहुमताने खासदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन या आशयाचे बॅनर लागले आहेत. तर श्रीरंग बारणे यांचा थेट भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच खासदारकीचे अभिनंदन होत असल्यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी शिंदेंचा सामना होत आहे. दोन टर्म खासदाराच्या समोर दरेकरांचे आव्हान सोपे मानले जात आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दुसरीकडे, राहुल शेवाळे यांच्याविरोधातही ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभा खासदार राहिलेल्या अनिल देसाई यांचं आव्हान आहे. तर मावळमधून श्रीरंग बारणे यांच्याविरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे संजोग वाघेरे रिंगणात आहेत.