ना पाऊस होता ना जोरदार वारा, तरीही वडाच्या झाडाच्या महाकाय फांद्या अचानक कशामुळे कोसळल्या, हे अद्याप समजलं जात नाही. परिसरात ‘पप्या’ नावाने ओळखले जाणारे अमित जगताप मित्रांमध्ये लाडके होते. ते मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मूल असा परिवार आहे.
काय घडलं त्या दिवशी?
वडाच्या झाडाखाली भाजी विक्रेत्याचे दुकान आहे. दुर्घटनेच्या वेळी भाजी विक्रेता वनराजे हा घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या बीडीडी मार्केटमध्ये गेला होता. दुकानाती सर्व साहित्याचं नुकसान झालं असलं तरी वनराजेचा लाखामोलाचा जीव बचावला.
अपघातात जखमी अमित जगताप यांना तातडीने परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु झाडाच्या बुंध्याखाली डोकं चिरडलं गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या जगताप यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
झाडाची फांदी अचानक कशी तुटली?
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी केली गेली नव्हती. काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळं कमकुवत झाली असावीत. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अंतर्गत येत असल्याचे सांगितले.
अमित जगताप सर्वांमध्ये लोकप्रिय होता. घडलेल्या घटनेचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या भागात दोन शाळाही असल्यामुळे लहान मुलांची नेहमीच वर्दळ असते. कालच्या दुर्घटनेवेळी सुदैवाने शालेय विद्यार्थी परिसरात नसल्याने मोठी दुर्घटना टळली, परंतु भविष्यात अशा घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनास्थळाची भेट घेत या विषयी खंत व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.