आदित्य ठाकरे काय म्हणाले?
कावेरी नाखवा यांचे पती, मुलगी यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. “माझ्याकडे शब्द नाहीत, त्यांना भेटल्यावर मन हलून जातंय. अपघात होत असतात, पण इतकी बेकार हिट अँड रनची केस.. मी तर म्हणेन हा मर्डरच आहे. त्याला शिक्षा ही कठोरात कठोर झाली पाहिजे. आपण जर त्या परिवाराच्या डोळ्यात पाहिलं तर मनातला राग, दुःख दिसतंय. नाखवाजींनी तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलंय.” अशा भावना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या.
तरी एक जीव वाचला असता
“इतकी भीतीदायक, भयानक गोष्ट आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत होऊ शकते. नरकातून राक्षस आला तरी तो असं करणार नाही, इतकी बेकार हिट अँड रनची केस आहे. मी कालही मागणी केली होती, की अनेक जण म्हणतील नुकसान भरपाई वगैरे.. पण नाखवा कुटुंबाला एक रुपया नकोय, त्यांना आरोपीला शिक्षा झालेली बघायची आहे. तो मिहीर शहा थांबला असता, तरी एक जीव वाचला असता. त्याने ज्या प्रकारे फरफटत नेलं, ते खूप भयानक आहे. लवकरात लवकर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला हवा. कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. मी तर म्हणतो त्याला कोळीवाड्यात भरचौकात सोडा” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
मिहिर राजेश शहा राक्षसच
“गुन्हेगार असेल तर गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकू शकता, पण राक्षस असेल तर काय करायचं? हा मिहिर राजेश शहा राक्षसच आहे. एवढं भयानक कृत्य आहे, की मनाला धक्का बसतो. ६० तासांनी तो सापडला. सीसीटीव्ही फूटेज होतं, मग इतका उशीर का? मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही, ते तपास करत होते. पण गृहमंत्री काही बोलले नाहीत. आता शिक्षा काय होते हे पाहायला हवं. जुहूतल्या ग्लोबस तापस बारवर बुलडोझर नेताय, पण मिहीरच्या घरावर बुलडोझर चालणार आहे का? यांना न्याय देण्याची मागणी आहे. देशातील कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.