बारामतीची हवा दोन कारणांमुळे तापली आहे : एकीकडे पारा चाळीस अंश सेल्सिअच्या पुढे आहे आणि दुसरीकडे प्रचार शिगेला पोहोचला आहे. एरवी एकतर्फी निवडणुकीचा अनुभव असलेले बारामतीकर या वेळी संभ्रमात आहेत. शरद पवार (साहेब) आणि अजित पवार (दादा) या दोघांनाही त्यांच्या हृदयात स्थान आहे. त्यांपैकी कोणाच्या बाजूने जायचे याबाबत मतदार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. ‘शरद पवार यांना या वयात सोडून जाण्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरल्याच्या’ भावनिक मुद्द्याद्वारे सहानुभूतीची लाट निर्माण होणार, की मतदारसंघातील विकासकामांसाठी अजित पवार यांनी दिलेल्या योगदानामुळे विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट नाही. मात्र, दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार केला जात असून, मतदारसंघातील गाव न् गाव आणि कोपरा अन् कोपरा पिंजून काढला जात आहे. पुण्याला चिकटून असलेल्या खडकवासला या शहरी मतदारसंघापासून पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या इंदापूरपर्यंत पसरलेल्या या मोठ्या मतदारसंघात सर्वदूर पोहोचण्याची पराकाष्ठा दोन्ही बाजूंनी होत आहे.
पवारांचे डावपेच
‘राष्ट्रवादी’तील ८० टक्के आमदार दादांसोबत आहेत. साहेबांसोबत जुन्या जाणत्यांची थोडी कुमक शिल्लक राहिली आहे. लेक सुप्रिया सुळे यांच्यासाठी बाप म्हणून पवार मैदानात उतरले आहेत. बारामतीतील जुने पारंपरिक विरोधक बाबालाल काकडे, संभाजीराव काकडे यांचे कुटुंबीय, चंद्रराव तावरे, दादा जाधवराव, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यासह अन्य छोट्या-मोठ्या जुन्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी घेतल्या. त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शरद पवारांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यात फारसे यश आले नाही. पक्ष चोरल्याचा आरोप करून पवारांनी अजित पवारांवर टीका करून पक्ष स्थापन कोणी केला, चिन्ह कोणी मिळविले, असे सवाल करून जनतेच्या मनात सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अजितदादा सोडून गेल्याने मिळत असलेली सहानुभूती, आतापर्यंतचा राजकीय अनुभव, कोणत्या विरोधकाने कोणता डाव टाकल्यास त्याला कसे चितपट करावे याचे ज्ञान ही शरद पवार यांची जमेची बाजू. त्याच्याकडे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज फारशी दिसत नसली, तरी जनतेतून स्वतःहून कार्यकर्ते समोर येऊन नवे चिन्ह घरोघरी पोहोचवित आहेत. संपूर्ण कुटुंबाची ताकदही मागे उभी राहिली हा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जनतेच्या विशेषतः ज्येष्ठ मंडळींसह काही प्रमाणात तरुणांच्या मनात पवार यांच्या विषयीची सहानुभूती दिसत आहे. नेहमीच्या पद्धतीने शेवटच्या सभेत काय संदेश देतील, त्यावरच सहानुभूती वाढणार की घटणार हे अवलंबून असेल.
अजितदादांची मोहीम
विविध निवडणुकांचा अनुभव असला, तरी पक्षातून बाहेर पडून एकट्याने निवडणूक लढविण्याची अजित पवार यांची ही पहिलीच वेळ. पत्नी सुनेत्रा यांच्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. सध्या त्यांच्याकडे नेते, कार्यकर्त्यांची फौज आहे. जोडीला पारंपरिक विरोधकही. दौंडमध्ये राहुल कुल, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी जुळवून घेण्याबाबत शिष्टाई केली. ती यशस्वी ठरली. महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारास तिघांनी सुरुवात केली आहे. अजित पवार यांनीही त्यांच्याकडे जाऊन मनोमिलन करून त्यांच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या मागे महायुतीची ताकद उभी आहे. अजित पवार यांनी बारामतीत विकासाची कामे केल्याची अनेक दाखले आहेत. त्याच आधारावर आता पुढील पाच वर्षात केंद्राचा निधी आणण्यासाठी मोदींच्या विचाराचा खासदार निवडून देण्याचा ते प्रचार करीत आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या आधीच्या तिन्ही निवडणुका अजित पवारांनी एकहाती हाताळल्या होत्या. प्रचाराच्या नियोजन, बूथप्रमुखांच्या नियुक्त्या, त्यांच्याकडून मतदान कसे करवून घ्यायचे याची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मतदारांना बाहेर काढून त्यांच्याकडून मताचे वजन मिळविण्यात अजित पवार किती यशस्वी होतात हेही पाहावे लागेल. अजित पवार यांची स्वतःची मते, भाजप, सेना आणि मनसे या महायुतीची मते पाहता सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक नक्कीच सोपी नाही. सुळे यांच्या बाजूने सहानुभूती असली, तरी त्यामुळे मतदारांना बाहेर काढून त्यांच्याकडून मतदान करवून घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने केवळ सहानुभूतीची लाट, भाजपविरोधी जनतेचा राग त्यांना तारणार की विकासाच्या मुद्द्यामुळे दादांना महायुतीसह जनतेची साथ किती मिळते यावर सुनेत्रा पवार यांच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत.
पवार अडकले मतदारसंघात?
दिल्लीत सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक छोट्या पक्षांशी मोट बांधून भाजप आणि ‘एनडीए’ सरकारला नामोहरम करण्याचे शरद पवारांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भाजपने अनेक डाव टाकून पवार यांना पश्चिम महाराष्ट्रात, त्यातही त्यांच्याच मतदारसंघात अडकविण्याचे भाजपचे मनसुबे काही प्रमाणात साध्य झाल्याची चर्चा आहे.