नणंद-भावजयनंतर आता काका-पुतण्यात सामना; विधानसभेला अजितदादांविरोधात युगेंद्र पवार?

बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता बारामती विधानसभेचा पार्ट टू एपिसोड रंगण्याची चिन्हे आहेत. बारामती विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी यासाठी आजच एक शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला आले होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवसांच्या मुक्कामी दौऱ्यासाठी बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी आहेत. आज सकाळीच युगेंद्र पवार समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या बारामतीतील शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना ताकद द्या आणि त्यांना विधानसभेला उमेदवारी द्या अशी मागणी केली.

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांचे कौतुक केले आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आम्ही तुम्हाला निर्णय कळवू असे उत्तर दिले. यानंतर कार्यकर्त्यांनी आमच्या भावनेचा विचार हवा अशी विनंती शरद पवार यांना केली. शरद पवार या संदर्भात जास्त काही बोललेले नाहीत. मात्र बारामती मध्ये युगेंद्र पवार हे विधानसभेला उमेदवार असतील अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

एकंदरीतच बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा आता सुरू झाली असून, अशी लढत झाल्यास नेमके काय चित्र दिसेल याचीही आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.