उद्धव ठाकरे काय म्हणाले?
एकीकडे शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्या व्यक्तीला बदनाम करायचं, त्याला पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा. महाराष्ट्राला हे बदनाम करत आहेत, लूटत आहेत, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्याचं त्यांना बघवत नाही. मुंबईची लूट करायची आणि सगळं गुजरातला घेऊन जायचं. पण महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडी सरकार थांबवेल आणि महाराष्ट्राचं वैभव जे गेलंय, त्यासोबत कित्येक पटीने अधिक परत आणू, अशी हमी उद्धव ठाकरेंनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला नाही, तरी पंतप्रधान हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा प्रचार करत आहेत. असा प्रकार कधीच घडला नाही. जे देतील साथ, त्यांचा करु घात.. असा प्रकार आहे.. दीड वर्षापूर्वी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते, की देशात एकच पक्ष राहील. मी कालच म्हटलं की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएसला पण नकली संघ म्हणतील. योगायोग म्हणजे नड्डांची मुलाखत आली आहे, त्यात ते म्हणतात की भाजप हा स्वयंपूर्ण पक्ष झाला आहे, आता त्याला संघाची गरज नाही, असं ठाकरे म्हणाले.
पुढचं शंभरावं वर्ष हे आरएसएससाठी धोक्याचं दिसत आहे, संघालाही हे नष्ट करुन टाकतील आणि एककलमी कार्यक्रम सुरु ठेवतील. ही हुकूमशाहीची नांदी आहे, ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला, त्याच संघाला किंवा संस्थेला हे संपवायला निघाले आहेत. यांना गद्दारांची घराणेशाही चालते, पण प्रमोद महाजन किंवा आमची चालत नाही, हा प्रकार घृणास्पद आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
नड्डा नेमकं काय म्हणाले?
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीतील संघाचं अस्तित्त्व आणि आताचं अस्तित्त्व यांच्यातल्या फरकाबद्दल नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू, संघाची गरज भासायची. आता आम्ही मोठे झाले आहोत, सक्षम आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालतो, असं उत्तर नड्डा यांनी दिलं. द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.