धंगेकरांना कसब्यात शह देण्यासाठी भाजपाकडून तीन शिलेदारांचा विचार केला जाऊ शकतो. यामध्ये विद्यमान शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर या तीन नावांची चर्चा सर्वात जास्त आहे. सोबतच टिळक किंवा बापट कुटुंबातील इच्छुक ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण संधी कोणाला मिळणार हे पाहावे लागेल.
आमदार मुक्ता टिळक यांच निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात उतरले होते. २ मार्च २०२३ रोजी हेमंत रासने यांचा पराभव केला आणि रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरले. या विजयाची चर्चा कसब्यापासून राज्यभर झाली. हा घाव भरून काढत लोकसभेत भाजपने काँग्रेसला मात दिली. आता कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पराभवाची कसर भरुन काढण्यासाठी भाजपाची चाचपणी सुरू आहे.
हेमंत रासने
हेमंत रासने हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते तसचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ट्रस्टी म्हणून काम पाहतात. पुणे महानगर पालिकामध्ये अनेक वर्ष नगरसेवक, तीन टर्म स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रासने यांना कसब्यातून संधी देण्यात आली होती. मात्र रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा पराभव केला. पराभव झाल्यानंतरही भाजपने त्यांच्याकडे कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली. गेल्या वर्षभरात रासने यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क जमा केला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. लोकसभा निवडणुकीत रासने नगरसेवक राहिलेल्या प्रभाग क्रमांक 15 मधून जवळपास 17 हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्य मुरलीधर मोहोळ यांना मिळाले आहे.
धीरज घाटे
RSS चे कट्टर समर्थक म्हणून धीरज घाटे यांच्याकडे पाहिलं जातं, सोशल ऍक्टिव्ह, पक्षाच्या कार्यक्रमांत सहभाग आणि पुढाकार घेणे तसेच वरिष्ठांकडून मिळालेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडणारा कार्यकर्ता म्हणून धीरज घाटे यांची ओळख आहे. धीरज घाटे तीन टर्म नगरसेवक राहिले असून त्यांनी पालिकेत सभागृह नेते पदही सांभाळलं आहे. जगदीश मुळीक यांच्या जागी त्यांना शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. लोकसभेला कसब्यातून चांगला लीड मिळाल्याने विधानसभा लढण्यासाठी धीरज घाटेही इच्छुक आहेत. मतदारसंघातून लीड मिळाला असला तरी स्वतः धीरज काटे नगरसेवक राहिलेल्या भागातून केवळ 640 मतांचे मताधिक्य मोहोळ यांना मिळाले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
गणेश बिडकर
गणेश बिडकर यांचा देखील सामान्य कार्यकर्ता ते नेता असा प्रवास राहिलेला आहे. 2017 साली महापालिका निवडणुकीत पराभव होऊन देखील पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. एवढेच नाही तर स्वीकृत नगरसेवक असतानाही सभागृह नेतेपदी बिडकर विराजमान झाले. वरिष्ठ नेत्यांशी असणारे त्यांचे खास संबंध कायम चर्चिले जातात.