दोन शिवसेनेत घमासान; शिवसेना भवन असलेल्या मतदारसंघात कोणाची सरशी?

मुंबई: शिवसेनेचं मुख्य कार्यालय अर्थात शिवसेना भवन येत असलेल्या दक्षिण मध्य मुंबईत कोणी बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत सामना होत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, निष्ठावंत सहकारी अनिल देसाई या मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर दोन टर्मचे खासदार राहुल शेवाळेंचं आव्हान आहे.
उमेदवार पक्ष विजय/पराजय
अनिल देसाई शिवसेना (उबाठा)
राहुल शेवाळे शिवसेना
अबुल हसन अली हसन खान वंचित
अर्जुन मुरुडकर बीजेकेपी
दीपक चौगुले बीआरएसपी

तब्बल ३ दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात यंदा दोन शिवसेनेत सामना झाला. शिंदेसेनेनं इथून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली. ते दोन टर्मपासून इथले खासदार आहेत. तर उद्धव ठाकरेंनी त्यांचे विश्वासू शिलेदार अनिल देसाईंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल देसाईंनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली.

मुंबई महापालिकेत नगरसेवक, मग स्थायी समितीचे अध्यक्ष असा चढता प्रवास केलेल्या राहुल शेवाळेंचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. तर अनिल देसाई तसे कायम पडद्यामागून कार्यरत राहिले. पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची पदं भूषवली. पण लोकांशी त्यांचा थेट संपर्क फारसा आलेला नाही. निष्ठावंत शिलेदारासाठी ठाकरेंनी त्यांची ताकद पणाला लावली होती.

दक्षिण मध्य मुंबईत धारावी विधानसभा मतदारसंघ येतो. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड इथल्या चार टर्मच्या आमदार आहेत. २००४ पासून त्या इथून सातत्यानं निवडून येत आहेत. मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्यानं त्या दक्षिण मध्यमधून लढण्यास इच्छुक होत्या. पण ठाकरेंनी इथून अनिल देसाईंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. काँग्रेसनं हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांच्यासाठी सोडण्याची विनंती ठाकरेंना केली होती. पण ठाकरेंनी देसाईंची उमेदवारी आधीच जाहीर केली होती. ती त्यांनी मागे घेतली नाही.

१९८९ मध्ये पहिल्यांदाच दक्षिण मध्य मुंबईमधून सेनेचा उमेदवार विजयी झाला. १९९१ ते २००९ अशी १८ वर्षे सेनेचे मोहन रावले या मतदारसंघाचे खासदार होते. २०१४ पासून राहुल शेवाळे इथून निवडून येत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला नाही. या मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. पैकी २ आमदार भाजपचे आहेत, तर शिंदेसेना, ठाकरेसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा प्रत्येकी १ आमदार आहे.