थरथरते पाय, डोळ्यात आसवं, चेहऱ्यावर हतबलता; मृतदेह ताब्यात घेताना कुटुंबीय हेलावले

प्रतिनिधी, मुंबई: घाटकोपर येथे सोमवारी संध्याकाळी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये जखमींचा आणि मृतांचा आकडा मंगळवारी वाढला. १४ निष्पाप व्यक्तींना या दुर्घटनेमध्ये प्राण गमवावे लागले तर जखमींचा आकडा ८८ वर गेला. सोमवारी रात्रीपासून या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या जखमींना शोधण्यासाठी राजावाडी, केईएम, लो. टिळक रुग्णालये नातेवाईकांनी पालथी घातली. सोमवारी रात्री आठ मृतदेह रुग्णालयाच्या ताब्यात होते. रात्री शवविच्छेदन करत नसल्याने मृतांच्या कुटुंबीयांना दुपारपर्यंत थांबावे लागले. त्यातील काही जण रात्रभर अन्न, पाण्यावाचून रुग्णालयांमध्ये बसून होते.

ज्यांचा मृत्यू झाला, मात्र ओळख पटलेली नाही त्यांचे कुटुंबीय घटनास्थळापासून रुग्णलयाकडे सैरभैर होऊन धाव घेत होते. दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या आपल्या माणसाचा मृतदेह घेण्यासाठी थरथरत्या पावलांनी कुटुंबीय राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन केंद्राच्या बाहेर उभे होते. मृतदेहाची ओळख पटवायची या विचारानेच काहीजण कोलमडले. काहीजण कुटुंबातल्या एकमेकांचा हात धरून उभे होते. दुपारी तीन वाजेपर्यंत सचिन यादव वगळता इतर १२ जणांचे मृतदेह ताब्यात देण्यात आले. ‘आमच्या माणसांचा काय दोष होता? काळाने त्यांच्यावर का झडप घातली? शेकडोवेळा नेत्यांच्या गाड्या या रस्त्यावरून ये-जा करतात, तेव्हा त्यांना हे होर्डिंग दिसले नाही का’, असा संताप कुटुंबीयांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होत होता. डोळे वाहत होते. सांत्वन तरी कुणी कुणाचे करायचे? प्रत्येकाची तीच गत.

रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांना अशा प्रसंगांना अनेकदा काळजावर दगड ठेवून समोर जावे लागते. मात्र, बेपर्वाईचे बळी ठरलेल्या या मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून तिथे असलेल्यांचेही डोळे पाणावले.
Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे बेपत्ता, मोबाईल स्विच्ड ऑफ, पोलिसांकडून शोध सुरु

त्यांच्या लेकराने काय करावे?

सचिन यादव हा २१ वर्षांचा मुलगा होर्डिंग कोसळले त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर काम करत होता. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला तो एकटा कर्मचारी. सचिनला त्याच्या मित्राने दोन वर्षांपूर्वी इथे कामाला लावले होते. दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या सचिनवर कुटुंबाची जबाबदारी होती. पेट्रोलपंपाच्या मालकाने त्याच्या कुटुंबीयांना मदत द्यावी. त्याची मुलगी अजून वर्षाचीही नाही. कुटुंबापुढे आयुष्याचा प्रश्न आहे. ते कुठे जातील, असा प्रश्न सचिनच्या मित्राने यावेळी उपस्थित केला.

पाच लाखांची मदत कशी पुरणार?

ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे पूर्णेश जाधव ४५ वर्षांचे होते. ते टुरिस्ट ड्रायव्हर होते. सोमवारी संध्याकाळी ते गाडी घेऊन दादरला गेले. तिथून ठाण्याला येताना सीएनजी भरण्यासाठी थांबले होते. त्यापूर्वी त्यांनी घरी फोन करून पत्नीकडे विचारपूस केली. लवकर घरी येतो सांगून फोन ठेवला. पण आली ती पूर्णेश गेल्याची बातमी. मूळचे रायगडचे असलेल्या पूर्णेश यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी फोन करून राजावाडी रुग्णालयामध्ये या, असे सांगितले. मध्यरात्रीपासून थांबलेल्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह पाहून धक्काच बसला. गाडीचालक असलेल्या पूर्णेश यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे काय होणार? सरकारने पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. ती किती दिवस पुरणार, असा प्रश्न त्यांच्या चुलत भावाने उपस्थित केला.

दोघे वाचले, पासवान गेले

अंधेरीचे रहिवासी दिलीप पासवान यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांचे मेहुणे राहुल पासवान यांनी ते फायबर ऑप्टिक केबल्सशी संबंधित काम करायचे अशी माहिती दिली. बीएआरसीमध्ये याच कामानिमित्त ते आले होते. तिथून पुढे भांडुपला जात असताना पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबले. काही कळायच्या आत वरून होर्डिंग पडले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या दुर्घटनेच्या वेळी अजून दोघेजण सोबत होते. ते वाचले आणि पासवान यांचा बळी गेला.

तो फोन उचलेल का?

‘फोनची रिंग अजूनही वाजते, पण तो फोन घेत नाही. किती वेळा त्याला फोन लावतोय. माझा लेक फोन घेईल का’, असा अस्वस्थ प्रश्न जेव्हा सूरज चौहान यांच्या वडिलांनी, महेश चौहान यांनी विचारला तेव्हा राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाबाहेर उभे असलेला प्रत्येकजण हेलावून गेला. महेश चौहान यांचा १९ वर्षांचा मुलगा सूरज व भाऊ धनेश या दोघांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. सूरज मानखुर्द येथे राहत होता. त्याने दहावी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिले होते. तो काकांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असे. त्यांच्यासोबत तो मुंब्य्राला जात होता. वाटेत इंधन भरण्यासाठी गाडी थांबली, त्या दुर्घटनेमध्ये त्याचा व त्याच्या काकांचा प्राण गेला. ड्रायव्हरचा फोन पथकाने उचलून भावाला अपघाताची माहिती दिली. त्यानंतर फोन बंद झाला. सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून सूरजचे भाऊ व त्याची आईने राजावाडी रुग्णालयाचा प्रत्येक वॉर्ड पालथा घातला. तो जखमी व्यक्तीमध्ये असेल या विश्वासाने आई आणि भाऊ धावत होते. पण त्याचे नाव मृतांच्या यादीमध्ये होते.