मोदींना निवडणूक जड जात असल्याचं चित्र काही विशिष्ट हितसंबंध असलेल्यांनी तयार केलं असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. मोदी चारशे पारचा उल्लेख त्यांच्या सभांमधून का करत नाहीत, असा प्रश्नही उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर घटना बदलण्याची चर्चा, दावे केले जात असल्यानंच ही घोषणा टाळली जात असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात राज्यात स्थिर सरकार असताना भाजपला अजित पवारांची गरज का भासली, या प्रश्नालादेखील फडणवीसांनी उत्तर दिलं. ‘मोदींच्या विकासकामांना अजित पवारांनी पाठिंबा दिला आहे. बारामतीच्या लढाईत दादांना त्यांच्या कुटुंबानं एकटं पाडलं. पण तरीही अजित पवार अभिमन्यूसारखे एकटे लढले. त्यांनी केलेल्या संघर्षाचं भाजपला अप्रूप वाटतं,’ असं फडणवीस म्हणाले.
अजित पवारांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही फडणवीसांनी भाष्य केलं. ‘२००९ ते २०१२ या कालावधीत मीच अजित पवारांवर आरोप केले. तेव्हा ते मंत्री होते. मी केलेल्या आरोपांची चौकशी झाली. मी केलेले आरोप खरे असल्याचं तपासातून उघडकीस आलं. ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांचं निलंबन झालं. अनेकजण बडतर्फ झालं, अनेकांना शिक्षा झाली. अजित पवार त्या विभागाचे प्रमुख होते. या संपूर्ण तपासाचा त्यांच्याशी थेट संबंध नव्हता. त्यामुळे आरोपपत्रात त्यांचं नाव आलं नाही. अजित पवार आता आमच्या सोबत आले आहेत. या प्रकरणाचा तपास २०१२ मध्ये झाला. आम्ही कधीही अजित पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले नाहीत,’ असं उत्तर फडणवीसांनी दिलं.