तुमचे लक्ष्य फडणवीस की मराठा आरक्षण?
प्रवीण दरेकर यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर टीका करायचे काही कारणच नाही. त्यांनी अलीकडच्या काळात ज्या प्रकारची भाषा सुरू केलीय ती त्यांनाच लखलाभ होवो. त्यांचा आणि माझा कलगीतुऱ्याचा सामना नाही. माझे एवढेच माफक म्हणणे आहे की, मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, आमदार समाजासोबत आहेत. परंतु अलीकडच्या काळात जरांगेंची भुमिका राजकारणासारखी वाटतेय. कारण जरांगे ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतात. शरद पवार त्यांना त्यांच्या भूमिकेबाबत विचारत नाही, ओबीसीतून आरक्षण द्यायला उद्धव ठाकरेंची तयारी आहे का, हेही विचारत नाहीत. काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका आहे. तुमचे देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार हेच लक्ष्य आहे की मराठ्यांचा प्रश्न हे लक्ष्य आहे, असा सवालही दरेकरांनी यावेळी केला.
ठाकरेंनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण घालवले
देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. त्यांची भाषा मराठा समाजाच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. उद्धव ठाकरेंच्या सरकारला ते टिकवता आले नाही. एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचे काय होणार, म्हणून अडीच वर्ष फडणवीसांनी दिलेले आरक्षण कसे फेल जाईल याकरिता कोर्टात वकील उभा राहिला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालवले, असा आरोपही दरेकरांनी केला.
….तर विधानसभेला भाजपच्या सगळ्या जागा पाडा
विधानसभा निवडणुकीत मराठे काहीही करू शकतात. सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण न दिल्यास भाजपचाच कार्यक्रम लावा. विधानसभेला त्यांच्या सगळ्या जागा पाडा, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी घेतली. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते.