दुर्दैव म्हणजे हे सारे जेव्हा घडत होतं तेव्हा त्याची मुलगी त्याचा व्हिडिओ काढत होती. त्यानेच मुलीला उडी घेतानाचा व्हिडिओ काढायला सांगितलं होतं. त्याच्या अशा अचानक जाण्याने धावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगी असा परिवार आहे.
बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू, लष्करातही सेवा
स्वप्नील धावडे हा बॉक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू होता. तसेच, त्याने भारतीय लष्करातही सेवा दिली होती. वर्षभरापूर्वीच तो सैन्यातून निवृत्त झाला होता. सध्या ते भोसरी येथे स्विमिंग आणि व्यायामाचे ट्रेनिंग देत असत. शनिवारी तो ३२ जणांचा ग्रूप घेऊन ताम्हिणी घाटात ट्रेकिंगला गेला होता. ज्यात त्याची मुलगीही होती. दिवसभर ट्रेकिंग केल्यानंतर परतीच्या वाटेवर निघणार तोच स्वप्नील मुलीला म्हणाला माझा पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ घे.
मुलगी व्हिडिओ घेत होती, स्वप्नीलने पाण्यात उडी घेतली त्यानंतर त्याने बाजूला असलेल्या दगडांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की तो त्यात वाहून गेला. हे सगळं घडत असताना त्याची मुलगीच त्याचा व्हिडिओ घेत होती. वडिलांसोबत जे घडलं ते तिने आपल्या डोळ्यांनी पाहिल्याने तिला मोठा धक्का बसला आहे. तर स्वप्नीलच्या पत्नीच्या डोळ्यातील आसवंही थांबत नाहीयेत.
पत्नीही गोल्डमेडलिस्ट खेळाडू
स्वप्नीलची पत्नी रश्मी धावडे या देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्या शुटिंगच्या खेळाडू असून त्यांनी दहा मीटर पिस्तूल आणि पंचवीस मीटर पिस्तूल या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. त्यांचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांना खेळाडू कोट्यातून पोलिसांत नोकरी मिळाली. रश्मी धावडे या पोलिसांच्या विशेष शाखेमध्ये कार्यरत आहेत.
पतीचा असा अचानक मृत्यू झाल्याने आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रश्मी यांच्यावर आली आहे. तर, दुसरीकडे आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे हे सत्य पचवणे त्यांना अत्यंत कठीण जात आहे. ही बातमी कळल्यापासून धावडे कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.