ठाकरे, शिंदेंच्या शिलेदारांना आव्हान, निवडून येण्याआधीच राजीनाम्याची भाषा; ‘तो’ उमेदवार कोण?

मुंबई: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले. आता ते महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना तिकीट दिलं आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या विरोधात बहुजन समाज पक्षाकडून शोएब खतीब रिंगणात आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात विविध आर्थिक गटातील लोकसंख्या आहे. उच्चभ्रूंचा परिसर अशी ओळख असलेला कफ परेड आणि अतिशय गरीब लोकसंख्येचा मदनपुरा, कामाठीपुरा असे भागही दक्षिण मुंबईत येतात. अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा थेट सामना इथे होत आहे. याशिवाय बसपकडून शोएब खतीब निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात एकूण १६ लाख मतदार असून त्यातील जवळपास २५ टक्के मतदार मुस्लिम आहेत.
अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांचा ‘रिऍलिटी’वर जोर; प्रफुल्ल पटेलांचं ‘ये दिल मांगे मोअर’
व्यावसायिक असलेले खतीब हे जुमा मशिदीचे विश्वस्त आहेत. करोना काळात त्यांनी दक्षिण मुंबईत बरंच सामाजिक काम केलं. याच कामाच्या आधारे ते निवडणूक लढवत आहेत. ‘विद्यमान खासदार १० वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत आहेत. ते आधी एनडीएत होते. आता ते इंडिया आघाडीत आहेत. तर गेल्या निवडणुकीत त्यांचे विरोधक असलेले मिलिंद देवरा आता शिवसेनेत आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते. तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात लढलेले अरविंद सावंत आता काँग्रेससोबत आहेत. अडीच वर्षांपासून ते सेक्युलर झाले आहेत,’ अशा शब्दांत खतीब यांनी त्यांच्या मतदारसंघातील आजी, माजी खासदारांनी बदललेल्या भूमिकांकडे लक्ष वेधलं.

तुमच्या पक्षाच्या अध्यक्षा मायावती आणि भाजपही काही काळ सोबत होत्या. त्यांची आघाडी होती. त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काय? असा प्रश्न खतीब यांना विचारण्यात आला. त्यावर बसपचा राजीनामा देईन, असं उत्तर त्यांनी दिलं. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एनडीएची फूस असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही ते आम्ही लोकांना सांगत नाही. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. पण काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. मला कोणाचीही फूस नाही. स्थानिकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी निवडणूक लढवतोय, असं खतीब म्हणाले.